मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात 'उत्तम लोकल' दाखल; काय आहे खासियत? जाणून घ्या
Mumbai local | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल (Mumbai Local) आता अधिक 'उत्तम' होणार आहे. प्रवाशांच्या आरामदायी आणि सुसह्य प्रवासासाठी लोकलच्या आसनव्यवस्थेत विशिष्ट बदल करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या नव्या उत्तम लोकल मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) ताफ्यात प्रत्येकी एक-एक दाखल करण्यात आली आहेत. मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर या लोकलच्या दररोज 10 ते 12 फेऱ्या होतात. तसंच आपत्कालीन वेळेत लोकल थांबवण्याकरता यात साखळी ऐवजी बटण देण्यात आले आहे.

'उत्तम लोकल'ची खासियत:

सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा विचार करुन लोकलची रचना करण्यात आली आहे. लोकलच्या प्रथम दर्जाच्या महिला आणि पुरुष डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आरामदायी बैठकीसाठी आसनाच्या मागील बाजूनस गादी देण्यात आली आहे. तसंच हवा खेळती राहण्यासाठी अंतर्गत रचनेतही बदल करण्यात आले आहेत. लोकल थांबवण्याकरता साखळी ऐवजी बटण देण्यात आले आहे. बॅगा ठेवण्यासाठी फायबरच्या रॅकची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई लोकलमधील गर्दी प्रवास त्रासदायक करते. परंतु, मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध पाऊलं उचलण्यात येतात. आता उत्तम लोकल प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आली आहे. दरम्यान, प्रवाशांना या लोकलमधील बदल कितपत भावतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Mumbai Local: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या रोडावली; पहा आकडेवारी)

दरम्यान, सध्या कोविड-19 संकटामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा गेल्यावर्षापासून बंद करण्यात आली होती. तब्बल 11 महिन्यांनंतर सेवा सुरु करण्यात आली असली तरी ठराविक वेळेतच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.