Gudi Padwa 2019: कॉंग्रेस पक्षाची उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी मराठमोळ्या पद्धतीने साजरा केला गुढी पाडव्याचा सण
Urmila Matondkar, Seen Celebrating Gudi Padwa (Photo Credits: ANI)

आज महाराष्ट्रात सर्वत्र गुढी पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस मराठी नववर्षाच्या पहिला दिवस मानला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात. चित्ररथ, मर्दानी खेळ, बाईक रॅली आणि लोककलेची पर्वणी अशा कार्यक्रमांमुळे शोभायात्रेत अनेक रंग भरले जातात. अभिनेत्री आणि कॉंग्रेस पक्षाची उमेदवार उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनीही अशाच एका शोभायात्रेत सामील होऊन गुढी पाडवा साजरा केला. जनतेशी संवाद साधण्याची एक आगळी संधी यानिमित्ताने उर्मिला यांना मिळाली होती.

यावेळी अगदी मराठमोळ्या अवतारात उर्मिला दिसून आल्या. पक्षाची उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर उर्मिला यांनी मुंबईमधील जनतेला आकर्षित करून घेण्यासाठी खास मराठी मधून संवाद साधायला सुरुवात केली. 'छम्मा छ्म्मा', 'रंगीला गर्ल' म्हणून बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी बुधवार, 27 मार्च रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. (हेही वाचा: निवडणूक प्रचारादरम्यान उर्मिला मातोंडकर हिने लहान मुलांसाठी गायले गाणे (Watch Video))

दरम्यान मुंबईतील बोरिवली परिसरात प्रचार करताना त्यांनी चक्क लहान मुलांसाठी गाणे गायले. 1982 साली प्रदर्शित झालेल्या 'मासूम' या त्यांच्याच सिनेमातील 'लकडी की काठी, काठी पे घोडा' हे गाणे गात त्यांनी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचे मन जिंकले. यावेळी उर्मिला यांना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला.