अमृता फडणवीस, उर्फी जावेद (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या चित्र-विचित्र कपड्यांमुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) चर्चेत आहे. याआधी तिच्या अनेक ड्रेसेसमुळे तिला ट्रोल केले आहे. आता उर्फी जावेद भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या निशाण्यावर आली आहे. नुकतेच चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाईचा इशारा दिला होता. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी उर्फी जावेदला पाठींबा दिला आहे. उर्फीने महिला म्हणून जे काही केले आहे त्यात काहीही चुकीचे नाही असे त्यांनी म्हटले आहे. उर्फी जावेदच्या ड्रेसवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत तिला पूर्ण कपडे घालण्याचा इशारा दिला होता.

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरु आहे. प्रथम चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांबाबत गुन्हा दाखल करत आणि तिला तुरुंगात पाठवण्याची मागणी केली, त्यावर उर्फीने त्यांना आपल्या पद्धतीने उत्तर दिले. या सगळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उर्फीला पाठिंबा दिला आहे. एक स्त्री म्हणून अभिनेत्रीने जे काही केले आहे त्यात काहीही चुकीचे नाही असे त्या म्हणतात. तिने जे केले आहे, ते स्वतःसाठी केले आहे, असे फडणवीस म्हणाल्या.

अमृता फडणवीस यांचा नुकताच 'मूड बना लिया' हा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे. याच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. जिथे त्यांनी गाण्याला लोकांच्या उत्तम प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला, त्याचबरोबर उर्फी जावेदच्या प्रकरणावरही आपले मत मांडले. त्या म्हणाल्या, ‘प्रत्येकाची स्वतःची मते आहेत. काही विशिष्ट कपडे घालणे किंवा एखादा सीन करणे ही व्यावसायिक गरज असेल तर, कलाकारांना तसे करावेच लागते. सार्वजनिक ठिकाणी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि आपल्या संस्कृतीचे पालन केले पाहिजे. उर्फी जावेदच्या कपड्यांबाबत चित्रा वाघ यांचे स्वतःचे मत असून त्यानुसार त्या कारवाईची मागणी करत आहेत.’ (हेही वाचा: 'जोपर्यंत माझे Private Parts दिसत नाहीत तोपर्यंत मला तुरुंगात टाकता येणार नाही'; उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांच्या तक्रारीला उत्तर)

दरम्यान, याआधी चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडेही तक्रार केली होती, त्यांनी या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर चित्रा यांनी पोलिसांसमोर हा मुद्दा उपस्थित केला आणि अभिनेत्रीच्या अटकेची मागणी केली. उर्फीला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तिने एक लांबलचक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला होता.