पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप (BJP) प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Union Cabinet Expansion) आज (7 जुलै) सायंकाळी सहा वाजता पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून चौघांना संधी देण्यात आली. यात महाराष्ट्रातून नारायण राणे (Narayan Rane), भागवत कराड (Bhagwat Karad), कपिल पाटील (Kapil Patil) आणि भारती पवार (Bharati Pawar) यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात या चौघांच्या रुपात महाराष्ट्राला नव्याने संधी मिळाली आहे. अर्थात या मंत्रिमंडळ विस्तारात रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांच्या रुपात दोन विकेट पडल्या. या दोघांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. नव्या मंत्र्यांबद्दल जाणून घेऊया थोडक्यात
नारायण राणे
नारायण राणे यांना मंत्रिपद देण्यापाठीमागे भाजपचा हेतू स्पष्ट दिसतो आहे. नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. भाजपला आजघडीला जोरदार आव्हान देणाऱ्या शिवसेनेसोबत त्यांचा 36 चा आकडा आहे. एके काळी ते शिवसेनेत होते. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमधून त्यांचा प्रवास भाजपमध्ये झाला. गेल्या काही काळापासून शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. त्यामुळे एनडीएतून बाहेर पडलेल्या आणि भविष्यात भाजपशी महाराष्ट्रात स्पर्धा करु इच्छिणाऱ्या शिवसेनेसोबत दोन हात करायचे तर तसेच एक तगडे व्यक्तीमत्व असायला पाहिजे हे भाजपने ओळखले. त्यातूनच नारायण राणे यांना संधी मिळाली असावी. (हेही वाचा, PM Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, 17 जणांचे स्थान पक्के झाल्याची चर्चा, चार कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा, महाराष्ट्रालाही संधी)
भागवत कराड
महाराष्ट्रातून केंद्रात मंत्री झालेल्यांपैकी एक नाव भागवत कराड यांचेही आहे. भागवत कराड हे भाजप खासदार आहेत. सोबतच ते ओबीसी नेते आहेत. गेल्या काही काळापासून भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला फारशी संधी नसल्याचा आरोप होत होता. दरम्यान, आता मंत्रिमंडळाचा विस्तार करतानाच ओबीसी समाजाला मोठी संधी दिली जाण्याची चिन्हे आहेत. भागवत कराड हा भाजपसाठी महाराष्ट्रातील ओबीसी चेहरा मिळू शकतो. राज्यात जे ओबीसी विरुद्ध मराठा असे काही समिकरण निर्माण होऊ पाहते आहे. त्यात आघाडी सरकारविरोधात लढण्यासठी कराड हा चेहरा महत्त्वाचा ठरु शकतो असा हेतू त्या पाठीमागे दिसतो.
कपील पाटील
कपील पाटील हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते. आज ते भाजपमध्ये आहेत. लोकसभा निवडणूक 2014 च्या तोंडावर ते भाजपमध्ये आले. ते ठाण्यातून येतात. भिवंडी मतदारसंघातून ते भाजप खासदार आहेत. ठाणे जिल्ह्यात आज शिवसेना पक्ष सत्ते आहे. इतकेच नव्हे तर ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या बालेकिल्ल्यात शिरकाव करायचा तर सत्तेचा वाटा त्या भागात पोहोचवला पाहिजे. त्यामुळेच त्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याची चर्चा आहे.
भारती पवार
भारती पवार या उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेत्या आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यापासून भाजपला उत्तर महाराष्ट्रात चेहरा हवा होता. भारती पवार यांच्या रुपात तो मिळाला. भारती पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या होत्या. दरम्यानचय् काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अल्पावधितच त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळत आहे. साधा कार्यकर्ता ते जिल्हापरिषद सदस्य आणि खासदार ते केंद्रीय मंत्री अशी मजल मारली आहे.