महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्यात 1 लाख 22 हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
Coronavirus in Maharashtra | Representational Image (Photo Credits: IANS)

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) अंतर्गत आतापर्यंत 1 लाख 22 हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून कोरोना काळात कर्करोग, हृदयविकार, किडनी विकाराच्या तब्बल 1 लाख 41 हजार 578 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी असलेल्या राज्यातील 1 लाख 985 कोरोनाबाधितांवर मोफत उपचार करण्यात आले. या काळात खासगी रुग्णालयात 18 हजार 228 तसेच केंद्र शासनाच्या, रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या आरोग्य केंद्रात 2778 असे एकूण 1 लाख 21 हजार 991 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमुळे राज्यातील सामान्य रुग्णांना मोफत उपचार घेणं शक्य झालं आहे. (हेही वाचा - Coronavirus: गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलिस दलातील 67 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण)

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने 23 मे रोजी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवली. राज्यातील सर्व नागरिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला. पांढरी शिधापत्रिका असलेल्या नागरिकांनादेखील या योजनेंतर्गत 31 जुलैपर्यंत लाभ घेता येणार आहे.

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा, यासाठी नव्याने निविदा काढून या योजनेत नवीन आजारांचा समावेश केला. नागरिकांनी या योजनेसंदर्भात तसेच नजीकच्या सहभागी रुग्णालयांविषयी अधिक माहितीसाठी योजनेच्या 24X7 सुरू असणाऱ्या 155388 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन डॉ. शिंदे यांनी केलं आहे.