Thane: परदेशी चलनाच्या नोटांची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक; 25 लाख जप्त
Arrest | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence) ठाण्यातील (Thane) उल्हासनगर (Ulhasnagar) येथील एका महिलेला अटक केली आहे. सोमवारी (27 सप्टेंबर), वाराणसी विमानतळावरुन (Varanasi Airport) या महिलेला अटक करण्यात आली होती. परदेशी चलनाची भारतात तस्करी केल्याप्रकरणी या महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून सुमारे 25 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ही महिला 27 वर्षांची असून ती उल्हासनगर येथील रहिवासी आहे. उल्हासनगर स्थित असलेल्या एका तस्करी करणाऱ्या टोळीसाठी ही महिला काम करत होती. (Mumbai: गुप्तांगातून सोन्याची तस्करी करणाऱ्या 3 महिलांना मुंबई विमानतळावरून अटक)

ही महिला वाराणसी विमानतळावर येणार असल्याची माहिती DRI ला मिळाली होती. या महिलेने प्रवासादरम्यान जिन्स आणि टॉप घातला होता. तिच्यासोबत अवजड सामान होते. सिक्युरीटी चेकिंग दरम्यान या महिलेच्या ट्रॉली बॅगमधून सुमारे 25 लाख रुपये जप्त करण्यात आले. यामध्ये 500 रियाल्सच्या 46 नोटा आणि 600 दिराम होते, असे DRI च्या सुत्रांनी सांगितले.

या महिला आरोपीला अटक केल्यानंतर तिला दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आले. आरोपी महिला ही पहिल्यांदाच चलन तस्करीचे काम करत होती. लवकरात लवकर पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी तिने हा मार्ग निवडला होता. ही महिला एका मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. दरम्यान, या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या इतर लोकांची माहिती मिळवण्यासाठी या महिलेची अधिक चौकशी करण्यात येईल, अशी माहिती DRI ने दिली आहे. (Mumbai: व्हेल माशाची 5 कोटींहून अधिक रक्कम असलेल्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक)

ऑगस्ट 2019 मध्ये अशा प्रकारची एक घटना समोर आली होती. मुंबईहून बँकॉकला जाणाऱ्या दांपत्याकडून इंटिलिजन्स युनिटने 1 कोटी रुपयांचे परदेशी चलन जप्त केले होते. या दांपत्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली होती.