Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरे यांची मोर्चेबांधणी, 10 शिलेदारांवर लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी; घ्या जाणून
Uddhav Thackeray | (Photo Credit - Twitter)

शिवसेना (Shiv Sena) हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पुन्हा एकदा नव्याने तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election) तोंडावर आल्याने त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. या निवडणुकीची जबाबदारी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील आपल्या 10 शिलेदारांवर टाकली आहे. ज्यामध्ये संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, अनिल देसाई, भास्कर जाधव, विनायक राऊत, राजन विचारे, रविंद्र वायकर, सुनिल प्रभू यांचा समावेश आहे. या दहा नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पिंजून काढला जाणार आहे. अतिशय सुक्ष्म नियोजन करुन संघटनेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जानेवारी 2024 पासून पक्षप्रमुख (उद्धव ठाकरे) महाराष्ट्राचा दौराही सुरु करणार आहेत. या सभांचेही नियोजन लवकपच केले जाणार असल्याचे समजते.

शिवसेना (UBT) पक्षाने महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणीसाठी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये प्रमुख 10 नेत्यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही जबाबदारी मतदारसंघ आणि विभागनिहाय सोपविण्यात आली आहे. ज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ,कोकण, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भ अशा सहा विभागांचा समावेश आहे. महत्त्वाचे असे की, ही जाबाबदारी वाटून देताना पक्षप्रमुखांनी पक्षातील नेत्यांची संख्याही वाढवली आहे. त्यामुळे प्रदेश समतोल राखला जाईल आणि नाराजी वाढणार नाही, याचीही दक्षता घेण्यात आली आहे. (हेही वाचा, Saamana Editorial on Eknath Shinde Fiction: 'मिंधे गटाचा बाप गुजरात किंवा दिल्लीत असावा', दैनिक सामना संपादकीयातून जोरदार टीकास्त्र)

कोणत्या नेत्याकडे कोणत्या विभागाची जबाबदारी

आमदार सुनील प्रभू : मराठवाडा, सोलापूर (लोकसभा मतदारसंघ: सोलापूर ,धाराशिव, लातूर, बीड)

आमदार रवींद्र वायकर : मराठवाडा (लोकसभा मतदारसंघ: नांदेड, हिंगोली, परभणी)

आमदार भास्कर जाधव: पूर्व विदर्भ (लोकसभा मतदारसंघ : नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर)

अनंत गीते - कोकण (रायगड) (लोकसभा मतदारसंघ : रायगड, मावळ, विधानसभा - पनवेल, कर्जत, उरण)

संजय राऊत- उत्तर महाराष्ट्र आणि पुणे (लोकसभा मतदारसंघ - नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिडीं, पुणे, बारामती, शिरूर, मावळ, विधानसभा पिंपरी, चिंचवड, मावळ)

खासदार राजन विचारे: कोकण (ठाणे, पालघर) (लोकसभा मतदारसंघ : ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर)

चंद्रकांत खैरे: मराठवाडा (लोकसभा मतदारसंघ : संभाजीनगर, जालना)

खासदार अरविंद सावंत: पश्चिम विदर्भ ९लोकसभा मतदारसंघ: बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ - वाशिम, वर्धा)

खासदार विनायक राऊत: कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) (लोकसभा मतदारसंघ: रत्नागिरी, सिंधुदुर्ग)

खासदार अनिल देसाई: पश्चिम महाराष्ट्र (लोकसभा मतदारसंघ : सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी)

शिवसेना पक्षात झालेल्या बंडानंतरही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे. दुसऱ्या बाजूला सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांनाही आमदार खासदारांच्या कार्यकर्ते गर्दी करत आहेत. त्यामुळे राज्यात कोणाचे पारडे जड याबाबत आगामी काळातच वास्तव पुढे येऊ शकणार आहे.