Sharad Pawar And Uddhav Thackeray (Photo Credit: PTI)

भाजप पक्षाने सरकार स्थापनेत असक्षम असल्याचे जाहीर केल्यावर, राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापनेची संधी दिली आहे. पण शिवसेना पक्षाला आज त्यांचा निर्णय राज्यपालांना सांगायचा असल्याने शिवसेना पक्ष सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची मदत घेऊ पाहत आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शरद पवार यांची भेट घेण्यास पोहोचले आहेत. त्यांची ही बैठक हॉटेल ताज लँड एंड्स इथे होत असून या बैठकीत काय चर्चा होणार हे मात्र अद्याप सांगण्यात आलेलं नाही.

एएनआय ने दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्यांच्यातील बैठकीला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे या बैठकीनंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज संध्याकाळी ४.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे.

शिवसेनेचे डोळे घड्याळाकडे; पाठिंब्याच्या प्रश्नावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडी 4.30 वाजता देणार अंतिम निर्णय

दरम्यान काँग्रेसचीही वर्किंग कमिटीची बैठक आज दिल्लीत झाली. मात्र काँग्रेसचा निर्णय अद्याप झालेला नाही.

तसेच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत शिवसेनेने आपली 'एनडीए'तून बाहेर पडण्याची भूमिका अधीकृत केली आहे. त्यांनी नुकतीच महाराष्ट्र सदन येथे पत्रकार परिषद घेत, "राज्यात युतीत वितुष्ट आलं आहे आणि अशा वातावरणात मंत्रिपदाचा कार्यभार हाती असणं मला योग्य वाटत नाही. याच कारणामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे," असं ते म्हणाले.