शिवसेनेचे डोळे घड्याळाकडे; पाठिंब्याच्या प्रश्नावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडी 4.30 वाजता देणार अंतिम निर्णय
Congress, Shiv Sena,NCP | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Government Formation: महाराष्ट्रात सत्तेचा तिढा सुटण्यासाठी आता अवघे काहीच तास शिल्लक आहेत. काल, सर्वाधिक मते मिळवूनही 145 ही मॅजिक फिगर गाठण्यास असमर्थ असल्याने भाजपानी सत्ता संघर्षातून माघार घेतली तर त्यानंतर लगेचच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याकडून दुसऱ्या क्रमांकावरील बहुमत मिळवणाऱ्या शिवसेनेला (Shivsena) सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. शिवसेनेला जर का बहुमत सिद्ध करता आले तर मुख्यमंत्री पदासहित राज्यात सेनेची सत्ता स्थापन होऊ शकते, मात्र यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत हातमिळवणी करणे सेनेला भाग आहे. याच मुद्द्यावर सेनेकडून कालपासून प्रयत्न होत असताना काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीने (NCP) अजूनही पाठिंबा देण्यासाठी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. याबाबत सध्या समोर येणाऱ्या अपडेटनुसार, आज संध्याकाळी चार वाजता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जिल्हा स्तरीय नेत्यांची एक बैठक घेण्यात येणार असून 4.30 वाजता अंतिम निर्णय देण्यात येणार आहे.

काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी देखील सेनेला पाठिंबा देण्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना, आपण निवडणूक ही महाआघाडी सोबत लढवली असल्याने जर का सेनेला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घ्यायचा झाल्यास तोही महाआघाडीच्या एकमताने घेण्यात येईल. असे सांगितले होते.

ANI ट्विट

दरम्यान, जर का शिवसेनेने महाआघाडी सोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर मुख्यमंत्रीपद सेनेकडे तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आणि विधानसभा अध्यक्ष सहित काही खाती काँग्रेस ला दिली जाऊ शकतात असे कयास बांधले जात आहेत. त्यामुळेच काँग्रेस या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता आहे.