'उद्धव ठाकरे ठीक आहेत'- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीनंतर Aaditya Thackeray यांची माहिती
CM Uddhav Thackeray | (Photo Credits- Facebook)

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिल्याने, महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या आमदारांनी त्याबाबत गदारोळ माजवला. कामकाजात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती विरोधकांना खटकत आहे. उद्धव ठाकरे यांनी आपली जबाबदारी (मुख्यमंत्रीपद) दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवावी, असेही भाजपकडून सांगण्यात येत आहे. अशात ‘मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक आहे, माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे, ते हवे तेव्हा येतील,’ असे आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकारांना सांगितले.

61 वर्षीय उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काल मंगळवारी त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभाग घेतला आणि व्हिडीओ कॉलद्वारे शिवसेना आमदारांशी चर्चाही केली. उद्धव ठाकरे रिकव्हर होत आहेत. त्यांच्या प्रकृतीमुळे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. उद्धव ठाकरे यांना विमानाने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.

आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नाही. अशा स्थितीत त्यांनी असे कोणतेही काम करू नये, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचेल. त्यांनी त्यांच्या जबाबदारीचा कार्यभार इतर कोणत्‍यातरी मंत्र्याकडे किंवा त्‍याच्‍या मर्जीतील व्‍यक्‍तीकडे सोपवावा. कोणावर विश्वास नसेल तर पुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे पदभार सोपवावा, पण असे दिसून येत आहे की, उद्धव यांचा त्यांच्यावरही विश्वास नाही. (हेही वाचा: लसीकरण न झालेले लोक लोकल ट्रेनमधून का प्रवास करू शकत नाहीत?; उच्च न्यायालयात याचिका दाखल, महाराष्ट्र सरकारने दिले 'हे' उत्तर)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची (उद्धव ठाकरे) प्रकृती ठीक नसेल आणि ते विधानसभेत येऊ शकत नसतील, तर आमची हरकत नाही. पण ते बरे असतील तर त्यांनी यावे, काम थांबू नये, नाहीतर ते वाटून घ्यावे.’ अजित पवार याआधी म्हणाले होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक आहे व ते अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. त्यांचा चार्ज इतर कोणालाही देण्याची गरज नाही.