
महाराष्ट्रात येत्या 21 ऑक्टोबर दिवशी विधानसभा निवडणूक 2019 पार पडणार आहे. त्याकह्या पार्श्वभूमीवर सारेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सध्या सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजापा पक्षाची जागावाटप अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म वाटप करायला सुरू केले आहे. अद्याप दोन्ही पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केली नसली तरीही काही मातब्बर उमेदवारांना एबी फॉर्म वाटले आहेत. आज नवरात्रीतील पहिला दिवस, घटस्थापनेचा मुहूर्त साधत अनेकांनी तो स्वीकारला आहे. पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवारीचा एबी फॅार्म विजय शिवतरे यांनी स्विकारला आहे. त्यांच्यासोबत 14 जणांना आज उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्मचे वाटप केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता; लवकरच होणार अधिकृत घोषणा
सध्या दिल्लीमध्ये भाजप-शिवसेनेच्या युती आणि जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे या बैठकीसाठी उपस्थित आहेत. या बैठकीत युतीच्या निर्णयासंबंधी घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र असं असताना मुंबईत उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यात आल्याने चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी आज भाजपची बैठक, उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता
विजय शिवतरे यांचे ट्वीट
शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवारीचा एबी फॅार्म स्वीकारला.
"पुन्हा, जोमाने कामाला लागूया.
पुरंदर-हवेली मतदारसंघावर भगवा फडकवूया.!"
जय महाराष्ट्र.#VijayShivtare #Shivsena pic.twitter.com/19QCM9Jcsw
— Vijay Shivtare (@vijayshivtare) September 29, 2019
मागील काही दिवसांपासून शिवसेना-भाजपा यांच्यामध्ये निवडणूकीतील जागा वाटपावरून तणाव आहे. सुरूवातीला 50-50 च्या फॉर्म्युलावर अडून बसलेली शिवसेना आता भाजपाकडून मिळेल ती ऑफर स्वीकारणार? की काही दिवसांपूर्वी दिवाकर रावते यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे युती मोडणार? याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नारायण राणे देखील भाजपामध्ये पक्ष प्रवेश करत असल्याची चर्चा असल्याने अनेक त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर यावर नाराजी दाखवली आहे.