मुख्यमंत्री पदाच्या भूमिकेवर शिवसेना ठाम, युती तोडण्याची उद्धव ठाकरे यांची इच्छा नाही: संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

शिवसेनेच्या भूमिकेत कोणताही बदल नाही. शिवसेना निर्णयावर ठाम आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सेना आमदारांची आज (7 नोव्हेंबर 2019) बैठक पार पडली. या बैठकीतही शिवसेना आमदारांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भुमिका उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. शिवसेना आमदारांची एक बैठक उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे पार पडली.  बैठकीनंतर संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. या वेळी बोलताना भाजपसोबतची युती तोडण्याची उद्धव ठाकरे यांची इच्छा नाही. असेही संजय राऊत म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आधी तीन वेळा आपली भूमिका मांडली आहे. यापूढे भूमिकेत कोणताही बदल नाही, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. दरम्यान, यापुढे पोलीसी दादागिरी, फोडाफोडीचे राजकारण, घटनाबाह्य कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला.

शिवसेना भाजपच्या साम, दाम, दंड, भेद या नितीला घाबरत आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता साम, दाम, दंड भेद हा तर आमचाच मंत्र आहे. त्याुमळे शिवेसना कोणाला घाबरत नाही. पण, आम्ही संयमाचे राजकारण करत आहोत, असे संजय राऊत म्हणाले. साम, दाम, दंड, भेद हा वृत्ती सत्तेतून येते. कोणा व्यक्तीमुळे नव्हे. सत्तेच्या जीवावर हे प्रकार चालतात आणि या सरकारची मुदत लवकरच संपत आहे. त्यामुळे त्या विचारात कोणी राऊ नये. भाजपकडे बहुमत आहे तर त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करावा आणि सरकार स्थापन करावे, असे आव्हानही संजय राऊत यांनी भाजपला दिले.  (हेही वाचा, भाजप आज 'सत्ता स्थापने'चा दावा करणार नाही; सुधीर मुनगंटीवार 'महायुती'चं सरकार स्थापन करण्यावर ठाम)

भाजप-शिवसेना वादामुळे मतदारांना पश्चाताप होतो आहे का? असे विचारले असता शिवसेनेला फसविणाऱ्यांना मतदारांना धडा शिकवायचा आहे, असा टोला भाजपला लगावतानाच शिवसैनिक हा कधीही खोटं बोलत नाही. जसं ठरलं आहे तसंच करा हीच शिवसेनेची भावना आहे, असा पुनरुच्चारही संजय राऊत यांनी केला.

भाजप-शिवसेना वादात आरएसएसने मध्यस्थी केली तर शिवसेना काय भुमिका घेणार या प्रश्नावर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर ते बोलणार आहेत का? आणि जर तसंच होणार असेल तर या तिढ्यात आरएसएस कशाला तो तिढा आपसातच सुटू शकतो, असे राऊत यांनी ठणकाऊन सांगितले.