झोपडपट्टी पुनर्विकास (Dharavi Redevelopment) प्रकल्प टेंडरच्या मुद्द्यावर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य, केंद्र सरकार आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबई येथे आयजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष विजयी झाल्यास त्यांचे सरकार धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे टेंडर रद्द करेल, अशी घोषणा केली आहे. ज्यामुळे आगामी काळात भाजप, राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय पाहायला मिळू शकते. पत्रकार परिषदेला संबोधित करताना ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींवर टीका केली. तसेच, मुंबईला आम्ही आदानी सिटी होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे ठामपणे म्हणाले. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेची खिल्ली उडवताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला जोरदार टोले लगावले. धारावी हे मुंबईतील सर्वात मोठे स्लम क्लस्टर आहे. काँग्रेस आणि शिवसेना (UBT), विरोधी महाविकास आघाडीचे दोन्ही भाग, अदानी समूहाकडून राबविल्या जात असलेल्या अब्जावधी डॉलरच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली 'लाडका मित्र योजना'
मुंबईत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली 'लाडका मित्र योजना' राबवली जात आहे. हा 'लाडका मित्र' कोण आणि तो कोणाचा मित्र आहे हे प्रसारमाध्यमांसह सर्वांनाच माहिती आहे, असे गौतम अदानी यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींवर टीका केली. आम्ही अतिरिक्त सवलती देऊ देणार नाही आणि गरज पडल्यास, सत्तेवर आल्यानंतर नव्याने निविदा मागवू. पण आम्ही ते होऊ देणार नाही. कोट्यवधी रुपयांच्या धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात अदानी समूहाला जमीन हस्तांतरणाचा समावेश नाही. त्याऐवजी ही जमीन महाराष्ट्र सरकारच्या खात्यांना हस्तांतरित केली जाईल. अदानी समूह, प्रकल्प विकासक म्हणून, आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतील रहिवाशांना वाटप करण्यासाठी या विभागांना सुपूर्द करणारी घरे बांधणार आहे. पण त्यासाठी धारावीकरांना वाऱ्यावर सोडू दिले जाणार नाही, असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला. (हेही वाचा, Gautam Adani On Indian Economy: 2032 पर्यंत भारत 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल; गौतम अदानी यांची भविष्यवाणी)
धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प एक "मोठा घोटाळा"
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अर्थसंकल्पीय मागण्यांवर महाराष्ट्र विधानसभेत बोलताना धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प हा एक "मोठा घोटाळा" असल्याचा दावा केला. या प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारकडून त्यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही त्यांनी केली. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बदलल्यानंतर संपूर्ण प्रकल्प रद्द केला जाईल, असे चव्हाण म्हणाले. हाच धाका पकडत आज उद्धव ठाकरे यांनीही धारावी पुनर्विकास प्रकल्पावर टीका केली. (हेही वाचा, Shankaracharya Avimukteshwaranand On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्यासोबत 'विश्वासघात' झाला; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद)
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा मोठा घोटाळा असून, राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अन्यथा ऑक्टोबरमध्ये पुढचे सरकार आल्यावर संपूर्ण प्रकल्पाला कात्री लावली जाईल," असे चव्हाण म्हणाले. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ल्यातील दुग्धशाळेची जमीन नुकतीच देण्यात आल्याचा मूळ निविदेत उल्लेख आहे का, असा सवाल त्यांनी केला. धारावी पुनर्विकासासाठी देवनार, मुलुंड किंवा मिठाच्या जमिनींसारख्या कोणत्या सरकारी जमिनी दिल्या जात आहेत याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि संभाव्य सरकारी महसुलाच्या नुकसानाची चौकशी करण्याची मागणी केली.
उद्योगपतींना अत्यंत कमी किमतीत सरकारी जमिनी दिल्या जात असून, सरकारला मिळणारा सर्व महसूल माफ करण्यात आल्याचा दावा चव्हाण यांनी केला. याला उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धारावी प्रकल्पाबाबत निविदा प्रक्रियेच्या तपशिलांसह श्वेतपत्रिका काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.