Uddhav Thackeray | (Photo Credit - Facebook)

Uddhav Thackeray On BJP: पूंछमध्ये लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यावरून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडल आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, राजकारण कसे करायचे हे भाजपलाच माहीत आहे. सैनिक शहीद होत असतानाही ते राजकारण सोडत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे राजकीय कामात व्यस्त आहेत. याचा फायदा दहशतवाद्यांनी घेतला आहे.

पक्षाने आपल्या मुखपत्र सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 379 रद्द केल्यानंतरही काश्मीर खोऱ्यात हिंसाचार सुरूच आहे. अजूनही शांतता नाही. कर्नाटक निवडणुकीच्या संदर्भात पंतप्रधानांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री त्यांच्या राजकीय कामात व्यस्त आहेत. याचाच फायदा घेत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. (हेही वाचा -Ajit Pawar Poster Pune: 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री', अजित पवार यांचे नाव आणि फोटो वापरुन झळकले पोस्टर; घड्याळ मात्र गायब)

गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात शहीद झालेल्या पाच जवानांपैकी चार पंजाबचे आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जवानांच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी चार शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. शहीद झालेले जवान हे दहशतवादविरोधी कारवायांसाठी तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीतील होते.

सामना संपादकीयमध्ये म्हटलं आहे की, पंतप्रधान पाकिस्तानशी युद्धाची भाषा बोलतात, पण जेव्हा चीनचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना गौतम बुद्धांच्या शांततेची शिकवण आठवते. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यावर निशाणा साधत म्हटलं आहे की, देशात मजबूत पंतप्रधान आणि गृहमंत्री असतानाही दहशतवादी हल्ला करण्याचे धाडस करत असतील तर काहीतरी गडबड आहे.