Ajit Pawar Posters In Kothrud : महाविकासआघाडी (MVA) भाजप विरोधात 'वज्रमुठ' घट्ट करत चालली असली तरी मविआचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके काय सुरु आहे असा प्रश्न उपस्थित होतो आहे. अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांसह भाजप सोबत जाणार असल्याच्या वावड्या उठल्या. स्वत: अजित पवार यांनीच या वावड्यांना पूर्णविराम दिला. असे असले तरी आता पुण्यातील कोथरुड परिसरात 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' असे म्हणत पोस्टर्स झळकले आहेत. या पोस्टर्सवरुन घड्याळ मात्र गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे पोस्टर्स नेमके कोणी लावले याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, या पोस्टर्सने पुन्हा एकदा अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
'मुख्यमंत्री व्हायला आवडेल' असे विधान अजित पवार यांनी पुणे येथे केले. या विधानानंतर पुढच्या अवघ्या काही तासांमध्येच पुण्यात पोस्टर्स झळकले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुढे आणखी काही भूकंप होणार का? याबाबत उत्सुकता आहे. पाठिमागील काही दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते. राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांतून पाठिमागच्या काही काळापासून जोरदार चर्चा सुरु होती. अजित पवार हे भाजपात जाणे हे जणून आता निश्चित झाले आहे, अशा थाटात प्रसारमाध्यमे वार्तांकन करत होती. स्वत: अजित पवार यांनीच मग प्रसारमाध्यमांसमोर येत माहिती दिली. आपण जीवात जीव असे पर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार आहोत. तसेच, भाजपसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीतील कोणताच गट मागणी करत नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. तरीही पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. (हेही वाचा, Ajit Pawar: राज्यात मुख्यमंत्री पदाची चर्चा, अजित पवार यांच्या विधानावर संजय राऊत, रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया)
अजित पवार लवकरच भाजपसोबत जातील असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केले आणि चर्चेला तोंड फुटले. मात्र, प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या बातम्या, दावे यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्वत:शरद पावार, अजित पवार यांनी स्पष्टीकरण देऊनही संशयाचे धुके मात्र अद्यापही कायमच दिसत आहे. परिणामी राज्याच्या राजकारणात अद्यापही संभ्रम कायम आहे. पुण्यात झळकलेल्या या पोस्टर्सनी हा संभ्रम आणखीच वाढवला आहे.