
मुख्यमंत्री (Chief Minister) पद आणि अजित पवार सध्या राज्याच्या राजकारणातत केंद्रस्थानी आहेत. एकाच वेळी प्रसारमाध्यमे आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात अजित पवार आणि मुख्यमंत्री पदाच्या चर्चा सुरु आहेत. अजित पवार (Sanjay Raut and Raosaheb Danve) हे महाविकासआघाडी पक्षातून बाहेर पडून भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा एका बाजूला आहे. तर दुसरीकडे आपण जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार, असे खुद्द अजित पवारच सांगत आहेत. दरम्यान, या चर्चेवर भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
केंद्रीय मंत्री, भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे की, अजित पवार हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते नक्कीच मुख्यमंत्री होतील. पण पुढच्या दहा ते वीस वर्षांमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळेल तेव्हा ते मुख्यमंत्री होऊ शकतात. सन 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी चालून आली होती. मात्र, तेव्हा राष्ट्रवादीने ती घेतली नाही. अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आले नाही. राज्याच्या जनतेला हा सर्व इतिहास माहिती आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले. (हेही वाचा, मुख्यमंत्री पद आणि एकनाथ शिंदे यांची नाराजी, अजित पवार स्पष्टच बोलले)
खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री होणं हे कोणत्या राजकीय नेत्याला आवडणार नाही? अजित पवार यांच्यात ती क्षमता आहे. सन 2024 मध्ये आम्हीच सत्तेत येऊ मग पाहू. अजित पवार हे प्रदीर्घ काळ राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर राहिले आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा अजित पवार यांनी विक्रम केला आहे. त्यामुळे क्षमता असल्याने ते नक्कीच मुख्यमंत्री होऊ शकतात. असे राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अजित पवार यांनीही पुणे येथील एका ठिकाणी बोलताना मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे विधान केले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पदासाठी 2024 पर्यंत वाट पाहण्याची काहीच आवश्यकता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आताही मुख्यमंत्री पद मिळवू शकतो, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या वर्तुळात अजित पवार पु्न्हा एकदा चर्चेत आले आहेत.