Udayanraje Bhosale | (Photo Credits: Facebook)

कोविड-19 रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लावलेले निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊनचा निषेधार्थ भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज दुपारी सातारा (Satara) मधील पोवाईनाका येथे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन  करुन त्यांनी 'भीक मागो' आंदोलनला सुरुवात केली. त्यासाठी ते एका झाडाखाली पोतं टाकून हातात थाळी घेऊन बसले. यावेळी उदयनराजे यांनी सचिन वाझे प्रकरणासह इतर अनेक विषयांवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामधील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. (भारतातील नागरिकांनी फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता - उदयनराजे भोसले)

लॉकडाऊनचा निषेध त्यांनी तीव्र शब्दांत केला आहे. "उद्यापासून नो लॉकडाउन म्हणत आज जर राजेशाही असती तर पैसे खाणाऱ्या सगळ्यांना मी हत्तीच्या पायाखाली तुडवल असतं. आम्हाला लॉकडाऊन नको. आमची जनता काय उपाशी मरणार का? जनतेचा उद्रेक झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार असेल, असंही ते म्हणाले.

कोरोनाच्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. लॉकडाऊनची परिस्थिती कायम राहणार असल्यास रोजगाराची भरपाई सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी. यामुळे जनतेला किमान दिलासा मिळेल अन्यथा जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यापूर्वी लॉकडाऊन नियमावलीचा पुनर्विचार करावा अन्यथा जनतेतून उद्रेक होईल, असा इशारा उदयनराजे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला होता. त्यानंतर आता त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सायंकाळी 5 वाजता होणार आहे. त्यात राज्यातील निर्बंध अधिक कडक करायचे की शिथिल याबाबत चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे मदत आणि आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता राज्य लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या समोर उभा राहिला आहे.