Udayanraje Bhosale on Corona Vaccine: भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. मात्र, सध्या महाराष्ट्रात कोरोना लसीचा पुरवठा कमी पडला आहे. परिणामी राज्यासह मुंबईत लसीकरण होणार नाही. याचं पार्श्वभूमीवर भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी भारतातील नागरिकांनी फॅमिली प्लॅनिंग केलं असतं, तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असं वक्तव्य केलं आहे.
कोरोना लसीच्या वाटपावरून उगाच वाद घालण्यात अर्थ नाही. देशात लोकसंख्या पाहून कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे, असंही यावेळी उदयनराजे म्हणाले. त्यांनी गुरुवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गावर तसेच लॉकडाऊनवर भाष्य केलं. (वाचा - COVID19 वरील लसीच्या डोसचा तुटवडा पडल्याने मुंबईतील लसीकरण थांबणार, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती)
लॉकडाऊन हा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पर्याय असू शकत नाही, असं स्पष्ट मतदेखील यावेळी उदयनराजे यांनी मांडल. ते पुढे बोलताना म्हणाले की, दुकानं बंद असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे द्यायचे? अनेक व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवायला कोरोना विषाणू फक्त तेव्हाच बाहेर येतो का? असा सवालही यावेळी उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
दरम्यान, यावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्यातील कोरोना निर्बंधावर टीका केली. व्यापाऱ्यांची बाजू मांडत ते म्हणाले, मी व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असतं तरी मी दुकान सुरू ठेवले असते. लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असं स्पष्ट मतही त्यांनी यावेळी मांडलं.