Lockdown in Maharashtra: महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन? विजय वडेट्टीवार यांचे संकेत
Vijay Wadettiwar (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने (Coronavirus Second Wave) राज्यात हाहाकार घातला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंधांसह विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन (Lockdown) लागू शकतो, असे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिले आहेत. राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र त्यांच्या कोणत्याच प्रयत्नांना यश येत नसल्याने नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचे वडेट्टीवार यांनी टीव्ही9 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

राज्यात लसींचा तुटवडा निर्माण होऊनही केंद्राकडून लसीचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी तीन आठवड्यांचा लॉकडाऊन अपरिहार्य आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. तसंच मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासावरही निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तवली. (मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! लोकलवर पुन्हा निर्बंध घालण्याचा राज्य सरकारचा विचार)

पुढे ते म्हणाले, पुढच्या 10 दिवसांत राज्यातील अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा 10 लाखांवर पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीत विरोधकांनी राजकारण न करता यातून मार्ग काढण्याचे उपाय सुचवावेत. दरम्यान, देशात इतर राज्यांमध्येही कडक निर्बंध आहेत. मात्र भाजप नेते त्यावर भाष्य न करता केवळ महाराष्ट्र सरकारच्या निर्बंधांवर टीका करत आहेत. मागील महिन्यात एमपीएससीची परीक्षा रद्द केल्यानंतर भाजप नेते रस्त्यावर उतरले होते. आताही ते व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.

कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता येत्या काही दिवसांत मनुष्यबळ कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अंतिम वर्षातील विद्यार्थी आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे. या माध्यमातून 5500 डॉक्टर्स उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.