MP Udayanraje Bhosale in Wai Court: खासदार उदयनराजे भोसले वाई न्यायालयात हजर
Udayanraje Bhosale | (Photo Credits: Facebook)

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आज (मंगळवार, 11 नोव्हेंबर) वाई न्यायालयात (Wai Court,) हजर झाले.आनेवाडी टोल नाका (Anewadi Toll Naka) हस्तांतरण आणि ताबा घेण्यावरुन उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांच्यात मागे एकदा मोठी धुमश्चक्री झाली होती. या वेळी जमावबंदीच्या आदेशाचा भंग झाल्या प्रकरणी उदयनराजे भोसले आणि अन्य 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी उदयनराजे भोसले वाई न्यायालयात पोहचले.

काय आहे प्रकरण?

खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडे आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन होते. हे व्यवस्थापन आपल्याकडे घेण्यासठी आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि त्यांचे काही समर्थक प्रयत्नशील होते. त्यामुळे या व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरुन शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यात वाद होता. (हेही वाचा, Satara: भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमधून चांदीची बंदूक चोरणाऱ्या युवकास अटक)

आनेवाडी टोल नाक्यावर 6 ऑक्टोबर 2017 (कोजागिरी पौर्णिमा) या दिवशी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये व्यवस्थापन हस्तांतरणावरुन मोठा वाद झाला. जमावबंदी आदेश असतानाही दोन्ही गटांमध्ये धुमश्चक्री झाली. या धुमश्चक्रीमुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले. त्यामुळे पोलीसांनी उदयनराजे व अन्य पंधरा जणांवर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या धुमश्चक्रीनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या घरासमोर दोन्ही राजांच्या गटात मोठा गोंधळ झाला होता. या वेळी गर्दी आणि गोंधळाचा फायदा घेऊन अज्ञाताने गोळीबारही केला होता. या प्रकरणी कोर्टात खटला सुरु आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी उदयनराजे यांचे कार्यकर्ते कोर्टात दाखल झाले होते. मात्र उदयनराजे अद्यापही कोर्टात दाखल झाले नव्हते. अखेर आज ते कोर्टात दाखल झाले.