Udayanraje Bhonsle | (Photo Credits: Facebook)

साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांच्या जलमंदिर पॅलेसमधून (Jalmandir Palace) चांदीची बंदूक चोरीला गेल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका युवकास अटक केली असून त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीकडून चांदीची बंदूक हस्तगत करण्यात आली होती. ही बंदूक शोभेची असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय या आरोपीने आणखी काही शोभेच्या वस्तू चोरल्या असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती होताच परिसरात एकच खळबळ माजली होती.

दिपक पोपट सुतार (वय, 26) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दिपक हा साताऱ्यातील माची पेठ येथे राहणारा आहे. उदयनराजे यांचे निवासस्थान जलमंदिर पॅलेसमधून आरोपीने चांदीची बंदूक चोरली होती.  तसेच ती बंदूक घेऊन तो सातारा येथील एका सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या व्यापाऱ्याकडे विकायला घेऊन जाणार होता. याबाबत सातारा शहर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल गुसिंगे यांना माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे दोन फूट लांब, दीड किलो वजनाची चांदीची बंदूक सापडली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. हे देखील वाचा- Chandrakant Pati: पत्रकारांनी आक्षेप घेताच चंद्रकांत पाटील यांची सारवासारव म्हणाले ' गैरसमज नसावा'

दरम्यान, घरातून बंदूक चोरीला गेल्याची उदयनराजे भोसले यांनी पोलिसांत तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच या चोरीला गेलेल्या बंदूकीची किंमत अंदाजे 1 लाख 4 हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.