Auto Rickshaw (Photo Credits: PTI)

पुण्यात मार्च महिन्याच्या अखेरीस उबरच्या ऑटो-रिक्षांसाठी नवीन धोरण लागू झाले, त्यानुसार उबर मोबाईल अॅप्लिकेशनवर दाखवलेले भाडे हे केवळ सूचक असून, प्रत्यक्ष भाड्याची रक्कम ही मीटर रीडिंगवर आधारित असणार आहे. म्हणजे मीटरवर जे भाडे दाखवले जाईल ते प्रवाशांना भरावे लागेल. पूर्वी, प्रवासी त्यांच्या प्रवासासाठी अॅपवर दाखवलेली निश्चित रक्कम भरत होते. मात्र या भाडे धोरणातील बदलानंतर, पुणेकर त्रस्त झाले असून, पुणेकरनी सोशल मीडियावर या निर्णयाबाबत तसेच मीटरमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, अनेक प्रवाशांनी जास्त पैसे आकारल्याच्या घटना नोंदवल्या आहेत. उबरने या बदलाचे समर्थन करताना सांगितले की, हे नवीन सॉफ्टवेयर-एज-ए-सर्विस (SaaS) मॉडेल चालकांना आर्थिक फायदा मिळवून देते.

याआधी 18 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या करारांनंतर 1 एप्रिलपासून, उबर आता अ‍ॅग्रीगेटर मॉडेलचे पालन करत नाही तर, सॉफ्टवेअर अ‍ॅज अ सर्व्हिस मॉडेलकडे वळले आहे. याअंतर्गत, उबर ऑटो चालकांकडून दररोज 19 रुपये असे निश्चित सॉफ्टवेअर शुल्क आकारते आणि भाडे व्यवहारात हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे उबर अ‍ॅपवर दाखवलेले भाडे आता फक्त सूचक असून, प्रवाशांना मीटरवर दाखवलेली रक्कम भरावी लागत आहे. या बदलामुळे पूर्वी फिक्स्ड अ‍ॅप-आधारित किमतींचा फायदा घेणाऱ्या प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

आरिफ खान नावाच्या एका प्रवासी व्यक्तीने एक घटना शेअर केली, जिथे अ‍ॅपमध्ये भाडे 145 रुपये दाखवले जात होते, परंतु मीटर रीडिंगच्या आधारे ड्रायव्हरने 170 रुपयांची मागणी केली. पुणेकरांसाठी ऑटो अधिक सुलभ आणि परवडणारे आहे, मात्र सध्याची व्यवस्था ड्रायव्हर्स आणि रायडर्समधील संघर्षाला प्रोत्साहन देत आहे. या धोरणात बदल झाल्याने उबरचे किंमत ठरवण्याचे नियंत्रण काढून टाकण्यात आले आहे, ज्यामुळे दैनंदिन प्रवासात पारदर्शकता आणि निष्पक्षतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. कारण यामुळे पुणेकरांमध्ये मीटर छेडछाडीच्या शक्यतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. अनेक प्रवाशांनी ऑटो-रिक्षा  चालकांनी फसवून जास्त पैसे आकारल्याच्या घटना नोंदवल्या आहेत. (हेही वाचा: Shivajinagar-Hinjawadi Metro Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम 90 टक्के पूर्ण)

पुण्यातील ऑटो युनियननेही या बदलाची माहिती देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बघतोय रिक्षावाला युनियनचे अध्यक्ष केशव क्षीरसागर म्हणाले की, त्यांनी चालकांना मीटरनुसार भाडे आकारण्याचे आणि प्रवाशांना लुबाडू नये असे सांगितले आहे. काही ऑटोमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजीत नवीन धोरणाची माहिती लावली आहे. तरीही, प्रवाशांचा असंतोष वाढत आहे, आणि ते पुणे RTO कडून कारवाईची मागणी करत आहेत. हे नवीन धोरण सध्या फक्त ऑटो सेवेसाठी आहे, आणि उबरच्या कॅब सेवेच्या भाड्यावर त्याचा परिणाम झालेला नाही. पुणेकरांसाठी हा बदल एक नवीन आव्हान ठरला आहे, आणि यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागेल.