लातूर (Latur) मध्ये हासोरी (Hasuri) गावात मागील काही दिवस भूकंपाचे धक्के जाणवत आहे. काल मध्यरात्री 1 वाजून 13 मिनिटांनी आणि तत्पूर्वी 9 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हे दोन्ही भूकंप अनुक्रमे 2.1 आणि 1.9 रीश्टर स्केलचे होते. हासोरी, बडुर, पिरपटेलवाडी आणि अंबुलगा ह्या मुख्य गावासह काही गावातही भूकंप जाणवला असल्याने या भागात नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, लातूर मधील निलंगा तालुक्यातील हासोरी मध्ये गणेशोत्सवापासूनच जमिनीतून आवाज येत होते. याबाबतची तक्रार करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. गावकर्यांच्या मते ते भूकंपाचे धक्के होते. भूगर्भातील हालचालींमुळे जमिनीतून आवाज येत होते असं गावकर्यांना समजवण्यात आले होते. या प्रकारानंतर दिल्लीहूनही पथक लातूर मध्ये दाखल झाले होते. त्यांनी हासोरी गावाला भेट दिली होती. हे देखील नक्की वाचा: 30 सप्टेंबर- लातूरकरांसाठी का असतो काळा दिवस ?
24 तासामध्ये दोनदा भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर आता गावातील मंडळी घाबरली आहेत. भूकंपामुळे घरात राहण्याची भीती आणि पावसामुळे बाहेर पडण्याची मुश्किल यामुळे दुहेरी संकटात अडकलेल्या गावकर्यांनी आता प्रशासनाकडे मदतीचा हात मागितला आहे.