तृप्ती देसाई यांची इंदोरीकर महाराजांना नोटीस; 10 दिवसांत उत्तर न दिल्यास न्यायालयात धाव घेणार
Trupti Desai, Indurikar Maharaj (PC - Facebook)

भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी इंदोरीकर महाराजांना (Indurikar Maharaj) आपले वकील मिलिंद पवार (Milind Pawar)यांच्या मार्फत नोटीस (Notice) पाठवली आहे. तसेच या नोटीशीला इंदोरीकर महाराजांनी 10 दिवसांत उत्तर न दिल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. या अगोदर तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महारांजाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तृप्ती देसाई यांनी या नोटीशीमध्ये इंदोरीकरांनी तमाम महिलांची माफी मागायला हवी, अशी मागणी केली आहे. इंदोरीकर आपल्या कीर्तनातून सतत महिलांचा अपमान करणारी वक्तव्य करतात. त्यांनी आतापर्यंत जाहीर माफी मागितलेली नाही. या नोटीशीला त्यांनी 10 दिवसांच्या आत उत्तर दिलं नाही तर न्यायालयात धाव घेऊ, असा इशाराही तृप्ती देसाई यांनी दिला आहे. (हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंदोरीकर महाराज यांना अभय देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना केबिनमध्ये कोंडून ठेवू - तृप्ती देसाई

इंदुरीकर महाराजांनी आपल्या एका किर्तनामध्ये लोकांना गर्भलिंगाविषयीचा 'ऑड-इव्हन फॉर्म्युला' सांगितला होता. 'सम संख्येला संग केल्यास मुलगा जन्माला येईल. तर विषम तारखेला संग केल्यास मुलगी जन्माला येईल,' असं इंदोरीकरांनी आपल्या किर्तनात म्हटलं होतं त्यामुळे इंदोरीकर यांनी गर्भलिंग निदानासंदर्भात जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22चं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर तृप्ती देसाई यांनी या प्रकरणी इंदुरीकर महारांजावर अहमदनगर येथे तक्रार दाखल केली आहे.

तृप्ती देसाई यांनी यापूर्वी इंदोरीकर महाराज यांच्यावर संतती प्राप्तीसंदर्भात तसेच स्त्री-पुरुष भेद निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली होती. तसेच इंदोरीकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभय देण्याचा प्रयत्न केला तर येत्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना त्यांच्या केबिनमध्ये कुलूप लावून कोंडून ठेवू, असा इशाराही दिला होता.