सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यावर संतती प्राप्तीसंदर्भात तसेच स्त्री-पुरुष भेद निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. परंतु, जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी इंदोरीकर यांना अभय देण्याचा प्रयत्न केला तर येत्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना त्यांच्या केबिनमध्ये कुलूप लावून कोंडून ठेवू, असा इशारा दिला आहे.
इंदुरीकर महाराज यांनी मंगळवारी आपल्या वक्तव्याबद्दल लेखी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, त्यांनी माफी मागितलेली नाही, असे सांगत तृप्ती देसाई यांनी येत्या 8 दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास इंदुरीकर महाराजांना काळे फासण्याचा तसेच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. (हेही वाचा - अजित दादा आपण आधीच एकत्र यायला हवं होतं - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)
तृप्ती देसाई यांनी मंगळवारी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल न केल्यास आम्ही इंदुरीकरांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. तसेच राजकारण्यांकडून इंदुरीकरांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही देसाई यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच इतर काही मंत्री इंदोरीकर महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारण्यांनी हा प्रकार बंद करावा, अन्यथा त्यांना मंत्रालयात कोंडून घेऊन अद्दल घडवू, असा इशाराही तृप्ती देसाई यांना दिला. (हेही वाचा - परळी: राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या कृत्यावर पकंजा मुंडे यांची संतप्त प्रतिक्रिया; 'हे खपवून घेतले जाणार नाही' धनंजय मुंडे यांना दिला इशारा)
दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी मंगळवारी आपला माफीनामा सादर केला. यात त्यांनी 'माझ्या अभ्यासानुसार, मी केलेल्या वक्तव्याचा माध्यमांकडून विपर्यास केला जात आहे. मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन व विविध जाचक अटी, रुढी परंपरा निर्मूलनावर भर दिला होता. मात्र, तरीदेखील माझ्या वाक्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हटले होते.