मराठा आरक्षणविरोधी सर्वोच्च न्यायालयात MPSC मार्फत याचिका दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली; प्रदीप कुमार यांच्या जागी स्वाती म्हसे पाटील यांची नियुक्ती
CM Uddhav Thackeray | (Photo Credit- Facebook)

मराठा आरक्षणविरोधी सर्वोच्च न्यायालयात MPSC मार्फत याचिका दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. प्रदीप कुमार (Pradeep Kumar) यांच्या जागी स्वाती म्हसे (Swati Mhase) पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत सुनावणी सुरु असताना MPSC ने परस्पर याचिका दाखल केली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच इतर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या याचिकेत प्रदीप कुमार यांनी एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांची निवड रद्द करण्याची मागणी केली होती.

MPSC ने परस्पर याचिका दाखल केल्यानंतर अजित पवार यांनी म्हटलं होतं की, MPSC स्वतंत्र असून स्वायत्त आहे. यामध्ये दुमत नाही. परंतु, राज्यात महत्त्वाचा विषय सुरु असताना MPSC ने याचिका दाखल करायला नको होती. एमपीएसीसीच्या याचिकेविषयी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना माहिती घेण्यास सांगितलं आहे. त्यामुळे कोणी जाणीवपूर्वक याचिका दाखल केली आहे का? यासंदर्भात तपास लागण्यास मदत होईल, असंही अजित पवार यांनी म्हटलं होतं. (वाचा - राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय अंतिम टप्यात - उदय सामंत)

दरम्यान, 9 सप्टेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्याच्या आधीच्या मराठा आरक्षण लाभावर परिणाम होणार नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. परंतु, एमपीएससीच्या काही जागाचे निकाल जाहीर होऊन नियुक्त्या बाकी होत्या. कोरोनामुळे या नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यामुळे नियुक्त्या करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

अशातचं MPSC ने यासंदर्भात दुसरी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेत MPSC ने न्यायालयाकडे मराठा आरक्षण लाभ वगळण्याची परवानगी मागितली. MPSC ने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सरकारला कल्पना नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. परंतु, त्यानंतर विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.