IAS Officer Transfer: मिलिंद म्हैसकर, उदय चौधरी यांच्यासह राज्यातील 5 आयएएस अधिकाऱ्यांची बदली
Legislative Council (PC - Twitter)

IAS Officer Transfer: राज्यात आज पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर (Milind Mhaiskar) यांची महसूल आणि वन विभागात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिलिंद म्हैसकर हे 1992 च्या बॅचचे अधिकारी आहेत. तसेच औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी (Uday Chaudhary) यांची मंत्रालय उपसचिव पदावर बदली झाली आहे. त्याचा पदभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपवून उपसचिव पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश चौधरी यांना देण्यात आले आहेत. उदय चौधरी हे 2010 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. (हेही वाचा - Exorbitant Electricity Bills: सामान्य नागरिकांना वाढीव वीजबिलांतून तत्काळ दिलासा द्यावा; देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारला विनंती)

याशिवाय अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांची ‘महाजनको’ (MAHAGENCO) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. खंदारे हे 1996 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तसेच नवी मुंबईतील ‘जलस्वराज्य प्रोजेक्ट’चे प्रकल्प व्यवस्थापक अजय गुल्हाने यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. ते 2010 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. (हेही वाचा - Coronavirus: महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती चिंताजनक; विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य)

दरम्यान, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सीईओ के. एच. बगाटे यांची शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचा कारभार सध्या प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यासाठी सोमवारी जिल्हाधिकाऱ्याच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.