Photo credit: archived, edited, representative image

चैत्र शु.प्रतिपदा, सर्वत्र हिंदु नववर्षदिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण गुढीपाडवा (Gudi Padwa) या नावाने साजरा होईल. वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी हा पुर्ण दिवस एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो. या दिवशी आवर्जून सोने-चांदी खरेदी केली जाते. काल शुक्रवारी सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली होती.  प्रति तोळा सोन्यासाठी शुक्रवारी वस्तू व सेवा करासह ३३ हजार ५०० रुपये मोजावे लागत होते. आतापर्यंतच्या गुढी पाडव्याच्या दरामधील हा सर्वात उच्चांकी दर आहे.

मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव कुमार जैन यांनी सांगितले, ‘गुढीपाडव्याला ग्राहक सोने खरेदीसाठी झवेरी बाजारासह अन्य बाजारपेठांत मोठी गर्दी करतात. गेल्यावर्षीच्या गुढीपाडव्याला प्रति तोळा सोन्याचा दर 30 हजार 224 रुपये होता. मात्र गेल्या वर्षभरात सातत्याने सोन्याचे दर वाढत असून, शुक्रवारी सोन्याचा प्रति तोळा दर 32 हजार 500 रुपये इतका होता. त्यावर सुमारे 1 हजार रुपये वस्तू व सेवा कर आकारल्याने प्रति तोळा सोन्याचा दर 33 हजार 500 होत आहे.’ (हेही वाचा: हे आहे गुढीपाडव्याचे पौराणिक महत्व; जाणून घ्या या दिवसाशी निगडीत काही कथा)

बाजारातील कालचा चांदीचा दर हा 40 हजार 368 प्रति किलो इतका होता. सोन्या चांदीच्या दरात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊनही ग्राहकांचा सोने खरेदीचा उत्साह कायम असल्याचा दिसून येत आहे.

गुढीपाडवा सोने दर (10 ग्रॅम)

18 मार्च 2018 – 30224

29 मार्च 2017 – 28651

8 एप्रिल 2016  -28974

21 मार्च 2015  -26170

31 मार्च 2014  -28511