कुपोषणमुक्तीसाठी राज्यात सर्वत्र सकस आहार पुरवठ्याला गती देणार, असल्याचं प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री (Women and Child Development Minister) ॲड. यशोमती ठाकूर (Adv Yashomati Thakur) यांनी आज केले आहे. नवराष्ट्र व नवभारत वृत्तपत्र समूहातर्फे आज ‘कोरोना संकटकाळात शासन- प्रशासनाचे प्रयत्न’ या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी नवभारतचे संपादक धनराज गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, आदी पदाधिकारी उपस्थित होते. (हेही वाचा - Coronavirus Cases In Mumbai: मुंबईत आज 1498 नवे कोरोना रुग्ण, तर 56 जणांचा मृत्यू; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 97,751 वर पोहचली)
दरम्यान, यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या की, कुपोषण हा केवळ दुर्गम क्षेत्रातील प्रश्न नाही, तर महानगरातदेखील ही समस्या आढळून येते. त्यासाठी सकस आहार पुरवठा सर्वदूर करण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याचे नियोजन होत आहे. बाळाच्या जन्माआधीपासून मातेला सकस आहार मिळणे व बाळाच्या जन्मानंतर त्या बालकाला सकस आहार मिळत राहाणे, असा व्यापक विचार करून योजना राबविण्याचा मानस असल्याचंदेखील यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलं. (हेही वाचा - Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात आणखी 8641 कोरोनाबाधित रुग्णांची भर तर 266 जणांचा बळी)
कोरोनाचे संकटाच्या मुकाबल्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जात असतानाचं विकासाची कामे सुरू ठेवणे हे आव्हान होते. या काळात सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. मात्र, शासन- प्रशासनाने अहोरात्र काम करून कामांना गती दिली. उपचारपद्धती निश्चित करण्यापासून ते स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारणे, तालुका स्तरावर कोविड केअर सेंटरची उभारणी, अहवाल तपासणीसाठी स्थानिक स्तरावर प्रयोगशाळा, प्लाझ्मा यंत्रणा, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, समाजात जनजागृती अशी अनेक कामे सुरु असतानाचं काही काळ बंद असलेल्या उद्योग- व्यवसायांना चालना देऊन रोजगारनिर्मितीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले असल्याचंही यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.
याशिवाय मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना देण्यात आली. त्यातून जलसंधारण, इमारत बांधकाम, रस्तेदुरुस्ती अशी अनेक कामे अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. त्यामुळे सुरुवातीपासूनच अमरावती जिल्हा मनरेगाअंतर्गत रोजगारनिर्मितीच्या कामात आघाडीवर आहे, असंही ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.