Siddhivinayak Temple to adopt Tivre Village (Photo Credits: File Image)

Tivre Dam Incident: रत्नागिरीच्या (Ratnagiri)  चिपळूण (Chiplun) तालुक्यातील तिवरे (Tivre Village) गावावर काही दिवसांपूर्वी धरणफुटीच्या रूपात मोठं संकट कोसळलं होतं. यामध्ये गावातील तब्बल 12 घरे वाहून गेली तर जवळपास 23 माणसे बेपत्ता होती. अनेक दिवसांच्या बचाव कार्यानंतर यातील २० जणांचे मृतदेह हाती आले आहेत तर अद्याप तिघांचा शोध लागलेला नाही. तिवरे धरण फुटल्याने आसपासच्या सात गावांमध्ये पाणी घुसले होते मात्र यामध्ये तिवरे गावाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यानंतर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत (Uday Samant)  यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडे (Siddhivinayak Mandir Trust)  गावाला दत्तक घेण्याची विनंती केली होती, ज्यानुसार आता मंदिर न्यासाकडून गावाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवून देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी ABP माझाशी बोलताना दिली.

सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या माहितीनुसार, तिवरे धरण फुटीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, अनेकांची संसार नाहीसे झाले,या सर्वांच्या पुनर्वसनासाठी आमदार उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला गेला आहे. आणि त्यानुसार मंदिर न्यासातून भरीव निधी उभारण्यात येणार आहे, हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. तसेच उपलब्ध निधीतून गावातील तुटलेली घरं, शाळा, रुग्णालय, बांधून तूर्तास गावकऱ्यांना अत्यावश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्याचा न्यासाचा प्रयत्न आहे.

आदेश बांदेकर

तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांप्रती दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशीचे आदेश

दरम्यान या घटनेनंतर विरोधक मंडळींनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते.या सरकारवरच हत्येचा गुन्हा दाखल करावा, त्यामुळं आमदार आणि कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासोबतच सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, असंही ते म्हणाले आहेत.