महाराष्ट्र सरकारकडून 24 डिसेंबर रोजी संविधान दिनानिमित्त तसेच भारतरत्न मौलाना आझाद आणि टिपू सुलतान (Tipu Sultan) यांची जयंती साजरी करण्यासाठी पुण्यातील बारामती परिसरात मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाला ही माहिती देण्यात आली. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) पक्षाचे पुणे युनिटचे अध्यक्ष फैय्याज शेख यांच्या, टिपू सुलतान, मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त तसेच संविधान दिनानिमित्त रॅली काढण्यास पोलिसांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी हायकोर्टात सुनावणी सुरू होती.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने नमूद केले की, एखाद्या व्यक्तीला मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांनी सर्व कायदेशीर अटी आणि निर्बंधांचे पालन केले पाहिजे.
विशिष्ट मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी परवानगी-
यापूर्वी पुणे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत रॅलीला परवानगी नाकारली होती. त्यानंतर फैय्याज शेख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आता मिरवणूक विशिष्ट मार्गाने काढण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती मंगळवारी खंडपीठाला देण्यात आली. पोलिसांनी बॅनर आणि कमानी लावण्यासाठी अद्याप ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही, याकडे याचिकाकर्त्याने लक्ष वेधले असता, सरकारी वकील हितेन वेणेगावकर म्हणाले की, ‘मिरवणुकीबाबत काहीशी अस्वस्थता आहे, त्यामुळे एका विशिष्ट मार्गाने परवानगी देण्यात आली आहे, परंतु आता याचिकाकर्ते संपूर्ण शहरात बॅनर आणि कमानी लावू इच्छित आहेत.’ (हेही वाचा: Maratha Reservation: मनोज जरांगे 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार; आरक्षण ओबीसी कोट्यातूनच देण्याची मागणी)
बॅनरबाबत 24 तासांत निर्णय घेण्याचे आदेश-
त्यावर, अशा कोणत्याही मिरवणुकीसाठी कायद्याने बंधनकारक असल्याप्रमाणे 24 तासांच्या आत बॅनर आणि कमानी लावण्याच्या अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश खंडपीठाने पोलिसांना दिले. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना असेही सांगितले की, ‘तुम्हाला (अर्जदार) मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे जे ठीक आहे, पण जर पोलिसांना वाटत असेल की कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असेल तर आम्ही हस्तक्षेप करणार नाही. ग्राउंड रिॲलिटीची आपल्याला जाणीव नाही. पोलिसांना ते चांगले माहीत आहे.’ त्यांनतर मिरवणुकीसाठी दिलेल्या परवानगीची खंडपीठाने दखल घेत याचिका निकाली काढली.