महाराष्ट्र: कडक निर्बंधांमुळे औद्योगिक आघाडीवर पुन्हा मोठी घसरण सुरू
Spinning Industry (Photo Credits-Twitter)

कोरोनाचा वाढता प्रसार आणि त्याला पायबंद घालण्यासाठी घातलेले दैनंदिन व्यवहारांवरचे कडक निर्बंध यामुळे औद्योगिक आघाडीवर पुन्हा मोठी घसरण सुरू झाली आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या (Maratha Chember of Commerce) वतीनं गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या पहिल्या टाळेबंदीपासून दर महिन्याला पुणे जिल्ह्यातल्या उद्योगांच्या सर्वेक्षणावर आधारित अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. काल प्रसिद्ध झालेला तेरावा अहवाल तरी हेच सांगतो.

मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात, औद्योगिक उत्पादनात 14% घट झाली असल्याचं, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड अंडस्ट्रीजनं केलेल्या पुणे जिल्ह्यातल्या, दीडशेहून अधिक उद्योगांच्या सर्वेक्षणातून पुढे आलं आहे. फेब्रुवारीतल्या उत्पादनाच्या तुलनेत ही घट, 16% आहे. फेब्रुवारीत क्षमतेच्या 85 टक्क्यांवर पोहोचलेलं उत्पादन, मार्चमध्ये 83 आणि आता एप्रिलमध्ये 69 टक्क्यांवर आलं आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Monsoon Update: सातारा, परभणीसह राज्याच्या विविध भागांना बसला अवकाळी पावसाचा फटका, शेतपिकांचे प्रचंड नुकसान

कामगारांची उपस्थिती, फेब्रुवारी आणि मार्चमध्येही, 86 टक्के होती, ती एप्रील मध्ये 70 टक्क्यांवर आली. मार्च महिन्यात 48 टक्के कंपन्या आपलं उत्पादन, कोविडपूर्व काळातल्या उत्पादनाच्या पातळीवर आलं असल्याचं सांगत होत्या, आता असं सांगणार्यार कंपन्यांचं प्रमाण 24 टक्क्यांवर आलं आहे. आता उत्पादन पूर्वपातळीवर येण्याबाबत, मार्च महिन्यात जी अपेक्षा होती त्याहून अधिक काळ लागू शकतो, असं वाटणार्याय उद्योजकांचं प्रमाणही वाढलं आहे.

मुळात ऑक्टोबरपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आणि निर्बंध शिथिल होत गेल्यानं, मोठ्या उद्योगांतल्या परिस्थितीत, फेब्रुवारीपर्यंत जेवढी सुधारणा झाली तितकी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांतल्या परिस्थितीत झाली नव्हती. आता नव्या लाटेनं त्यांना पुन्हा फटका बसला असून, सूक्ष्म उद्योगातल्या उत्पादनाची पातळी, 50 टक्क्यांवर आली आहे. साथीचा जोर आणि निर्बंध अजूनही कायम असल्यानं, मे महिन्यात त्यात फारशी सुधारणा होण्याची चिन्हही दिसत नाहीत.