Coronavirus: पुण्यात आज 13 महिन्यांच्या बाळासह 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू
Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

Coronavirus: पुण्यात (Pune) आज 13 महिन्यांच्या बाळासह 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 151 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात पुण्याच्या आरोग्य विभागाने (Pune Health Department) माहिती दिली आहे.

पुण्यात शनिवारी दिवसभरात 135 नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2380 वर पोहोचली आहे. पुण्यात नोंद करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये नायडू-महापालिका रुग्णालयात 107, खासगी रुग्णालयात 23 आणि ससून रुग्णालयात 5 जणांचा समावेश आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली होती. (हेही वाचा - COVID19: मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातील 81 कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, मध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज मुंबई भागात 875 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 13564 वर पोहोचली आहे. धारावीत आज 26 नव्या कोरोना बाधितांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 859 वर पोहोचली आहे.