सातत्याने सुरु असलेल्या पावसाने मुंबईकरांची दैना केली असून आता साथीच्या तापानेही डोके वर काढले आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे साथीच्या तापाने एकाच दिवशी तीन बळी गेले आहेत. यात दोन लहान मुलं आणि एका तरुणाचा समावेश आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाने चौकशी सुरु केली आहे. (मुंबईत 'स्वाईन फ्लू'चा वाढता धोका; अशी घ्या खबरदारी)
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, कल्याणच्या 4 वर्षीय तनुजा सावंत आणि श्लोक मल्ला यांना मेंदूज्वराची लागण झाली होती. उपचारादरम्यान ब्रेनडेड झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर गुरुवारी कल्याण मधील गणेशवाडी परिसरात राहणाऱ्या शुभम शिवदे याचा डेंग्यूने मृत्यू झाला. केईएम हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरु होते. अखेर त्याचा बळी गेला. (Monsoon Health Tips: पावसाळ्यात ही 5 फळे खाल्ल्याने आजारापासून होईल बचाव)
या सर्व प्रकारामुळे कल्याण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्य यंत्रणा देखील चिंतेत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे शर्थीचे प्रयत्न आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत. (दमदार पावसानंतर मुंबईत काविळ, गॅस्ट्रो, मलेरिया रुग्णांच्या संख्येत वाढ)
मुसळधार पावसाने मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील नागरिकांची दैना केली असून आता आजारपणही डोके वर काढू लागले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता राखणे गरजेचे असून आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे.