मुंबईत 'स्वाईन फ्लू'चा वाढता धोका; अशी घ्या खबरदारी
Swine Flu (Photo Credits: PTI)

पावसाळा आणि आजारपण हे समीकरण झाले असतानाच मुंबईत स्वाईन फ्लू चा जोर वाढू लागला आहे. जुलैच्या 14 दिवसांत मुंबईत स्वाईन फ्लू च्या 36 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी केईएम रुग्णालयात एका महिलेचा मृत्यूही झाला आहे. त्याचबरोबर हिपेटायटिसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पालिका अनेक उपाययोजना राबवत आहेत. तसंच रुग्णांवर वैद्यकीय उपचारही केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. (मुंबईत 'स्वाईन फ्लू' चा पहिला बळी, केईएम रुग्णालयात तरुणीचा मृत्यू)

स्वाईन फ्लू सोबतच मुंबईत कावीळ, प्लेटो, गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरिया हे आजार देखील फोफावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

स्वाईन फ्लू ची लक्षणे:

ताप येण्यासोबत सर्दी, घसा सुजणे, छातीत कफ जमा होणे यांसारखी लक्षणे दिसून आल्यास H1N1 ची तपासणी जरुर करा. त्याचबरोबर तीन दिवसांपेक्षा अधिक वेळ 101 डिग्रीवर ताप असल्यास, थकवा जाणवत असल्यास, भूक कमी लागत असल्यास त्याचबरोबर उलटी होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अशी घ्या खबरदारी:

# वारंवार डोळ्यांना , नाकाला व तोंडाला हात लावणे टाळा.

# अस्वच्छ व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

# तुमच्या परिसरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला असेल तर बाहेर जाताना मास्कचा वापर करा.

# खोकताना किंवा शिंकताना तोंडावर-नाकावर रुमाल ठेवा.

# फ्लू ची लागण झालेल्या व्यक्तीपासून लांब राहणेच योग्य ठरेल. अशा व्यक्तींच्या वस्तू वापरणे टाळा.

तसंच स्वाईन फ्लू च्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.