Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

पाकिस्तान (Pakistan) सोडून भारतात आलेल्या सीमा गुलाम हैदरच्या संदर्भात मुंबई पोलिसांना धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुरुवारी (13 जुलै) सांगितले की, नियंत्रण कक्षाला काल धमकीचा फोन आला होता. ज्यामध्ये कॉलरने पोलिसांना धमकी दिली होती की, जर पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर पाकिस्तानात परतली नाही तर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहा. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुंबई पोलिसांनी सांगितले की कॉलरने 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याची तयारी करण्याची धमकी दिली आणि उत्तर प्रदेश सरकारला दोष दिला. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला असे अनेक कॉल्स येतात आणि आता हा कॉल खरा आहे की बनावट याचा तपास पोलीस करत आहेत.

पाकिस्तानी महिला सीमा हैदर पबजी या ऑनलाइन गेमिंगदरम्यान यूपीच्या नोएडा येथील सचिनच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर सीमा पाकिस्तानातून पळून नेपाळमार्गे भारतात आली. ही बातमी समोर आल्यानंतर सीमा हैदरला भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी नोएडा पोलिसांनी सचिनला अटकही केली होती. मात्र, नंतर दोघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. (हेही वाचा: Watch: 'मी माझा गळा चिरेण, विष खाईन परंतु पाकिस्तानात जाणार नाही'; PUBG खेळाद्वारे प्रेमात पडून भारतामध्ये आलेल्या महिलेचा निर्धार)

सीमा आपल्या चार मुलांसह भारतात आली आहे. सध्या ती मुलांसोबत सचिनच्या घरी राहत आहे. आपल्याला पाकिस्तानला परत पाठवल्यास आपल्या जीवाला धोका असल्याचे सीमाने सांगितले आहे. सीमा हिच्या पहिल्या पतीने पत्नी आणि मुलांना पाकिस्तानमध्ये परत पाठवण्याची विनंती भारत सरकारकडे केली आहे. ज्यावर सीमाने सांगितले की, स्वतःचा प्राण गेला तरी मात्र आपण पाकिस्तानमध्ये परत जाणार नाही. तिने स्वतःच्या इच्छेने हिंदू धर्म स्वीकारून सचिनशी लग्न केले असल्याचे समोर आले आहे. मात्र सीमा ही पाकिस्तानी जासूस असल्याचेही दावे केले जात आहेत. अशात सीमाबाबत पोलिसांना धमकीचा कॉल आला आहे.