सीमा हैदर (संग्रहित संपादित प्रतिमा)

काही दिवसांपूर्वी पबजी (PUBG) खेळाद्वारे भारतीय तरुणाच्या प्रेमात पडून एक पाकिस्तानी महिला आपल्या मुलांसह आपल्या भारतामधील प्रियकराला भेटायला आल्याची बातमी समोर आली होती. आता या महिलेने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला आहे. नोएडातील एका तरुणासोबत राहण्यासाठी अवैधरीत्या आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून ही महिला पाकिस्तानमधून भारतामध्ये आली आहे. सीमा हैदर असे तिचे नाव असून, नुकतेच बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत मायदेशी परतण्याचा आपला विचार नसल्याचे तिने सांगितले.

आपण विष खाऊ, स्वतःचा गळा चिरू परंतु आपण पाकिस्तानमध्ये परत जाणार नाही, असे तिने सांगितले. पबजी खेळताना पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील सीमा ही ग्रेटर नोएडा येथील सचिनच्या प्रेमात पडली. त्यानंतर सचिनसोबत लग्न करण्यासाठी ती नेपाळमार्गे भारतामध्ये आली. सीमा आणि सचिन यांनी 13 मार्च रोजी काठमांडूच्या पशुपती नाथ मंदिरात लग्न केले. त्यानंतर सीमाने हिंदू धर्म स्वीकारला.

बीबीसीच्या मुलाखतीत सीमा म्हणते., ‘मला कोणीही इकडे पाठवले नाही. मी प्रेमाखातर माझ्या स्वेच्छेने येथे आले आहे. पाकिस्तानातील महिलांसाठी कठोर नियम आहेत तसेच तिथे आपल्या जिवाला संभाव्य धोका आहे त्यामुळे मला परत तिकडे जायचे नाही.’ पाकिस्तानमधील तिच्या कुटुंबाबद्दल विचारले असता ती भावुक झाली. आपल्या बहिणीला ‘आय लव्ह यू’ असा संदेश पाठवत, आपल्याला आपल्या मातृभूमीची खूप आठवण येते पण परत यायची इच्छा नसल्याचे तिने सांगितले.

13 मेला सीमा आपल्या मुलांसह ग्रेटर नोएडाला पोहोचली. 4 जुलै रोजी सीमाला तिच्या मुलांसह भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अवैध स्थलांतरितांना आश्रय दिल्याप्रकरणी सचिनलाही अटक करण्यात आली होती. शनिवारी सीमा आणि सचिन जामिनावर तुरुंगातून बाहेर पडले. याआधी गुलाम हैदर नावाच्या व्यक्तीशी सीमाचे लग्न झाले होते. सीमाला चार मुले आहेत. (हेही वाचा; PUBG गेम आणि प्रेम प्रकरण: बायको, मुलांसह परत पाठवा; पाकिस्तानी नागरिकाचे मोदी सरकारला साकडे)

सीमा हिचा पती, गुलाम हैदर हा सौदी अरेबियात काम करतो. त्याने एका व्हिडिओ संदेशाद्वारे भारत सरकारला त्याच्या पत्नीला पाकिस्द्तनमध्ये पाठवण्याची विनंती केली आहे. व्हिडिओमध्ये, तो म्हणतो की त्याला त्याची पत्नी आणि मुले नोएडामध्ये असल्याची माहिती भारतीय माध्यमांद्वारे मिळाली. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सीमाने खुलासा केला की, गुलामशी तिचे लग्न जबरदस्तीने आणि अगदी लहान वयात झाले होते. आता आपण सचिनसोबत खुश आहोत त्यामुळे आपले प्राण गेले तरी आपण पाकिस्तानमध्ये परत जाणार नाही.