
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) महाराष्ट्रात (Maharashtra) बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सतत नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आला आहे. राज्यात दरवर्षी नियमितपणे गुढीपाढवा ( Gudhi Padwa 2020) साजरा करून मराठी नुतन वर्षाची सुरुवात केली जाते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या कोरोना यंदाचा गुढीपाढवा सर्वांनी घरातच थांबून साजरा करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. सध्या देशावर कोरोना व्हायरसचे संकट वावरत आहे. संपूर्ण देश गेल्या अनेक दिवस कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. कोरोना व्हायरसचा धोका पूर्णपणे संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा, असेही ते म्हणाले आहेत. सध्या राज्यात जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी सार्वजनिक आणि खाजगी ठिकाणी गर्दी न करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवात घरोघरी गुढ्या उभारुन, शोभायात्रांचे आयोजन करुन सामुहिक पद्धतीने करण्याची आपली परंपरा आहे. यावेळीही घरोघरी गुढ्या उभारल्या जातील. परंतु, शोभायात्रांचे आयोजन व सामूहिक आयोजन टाळण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह, कौतुकास्पद असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. नागरिकांनी यंदा करोनाविरोधात लढण्याची, जनजागृती करण्याची, त्याला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीला नागरिकही मोठा प्रतिसाद देत आहेत. मात्र, उद्या 25 मार्चला गुढीपाडवा मराठी नववर्ष आहे. कोरोनामुळे यंदाचा गुढीपाडवा हा नागरिकांना सामुहिकरित्या साजरा करता येणार नाही. मात्र, हा उत्साह राखून ठेवा, देशावरचा कोरोना व्हायरसचा धोका पूर्णपणे संपल्यानंतर आनंद साजरा करु, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. हे देखील वाचा- मुंबई: कोरोना व्हायरस दहशतीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाकडून KEM सह पालिका रूग्णालयांच्या परिसरात निर्जंतुकीकरण
कोरोनाची लागण होऊन आज आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्याती मृतांच्या आकडा 3 वर पोहचला आहे. संबंधित रुग्ण हा 65 वर्षीय असून नुकताच UAE हून परतला होता. या रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता, यामुळे परिस्थिती गंभीर होती त्यातच कोरोनाचा त्रास बळावल्याने काल या व्यक्तीचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या प्रसारापासून वाचण्यासाठी मधुमेह, अस्थमा, उच्च रक्तदाब आणि वृद्धांनी अधिक सतर्क राहावे , असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रसार माध्यामांच्या मार्फत नागरिकांना केले आहे.