प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

ठाणे येथे गुरुवारी (31 जानेवारी) एका चोराने न्यायमूर्तींना चप्पल फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी न्यायमूर्तींनी आरोपीला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायमूर्ती आणि वकिलांनी या घटनेचा निषेध करत कोर्टाबाहेर आंदोलन केले.

अश्रफ अन्सारी असे या आरोपीचे नाव आहे. अश्रफला पोलिसांनी चोरी केल्याप्रकरणी अटक केली होती. बुधवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायदंडाधिकारी एचजे पठाण यांनी अश्रफ विरुद्ध सुनावणी करण्यास सुरुवात केली. तसेच त्याला सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा ही सुनावली गेली.

मात्र न्यायामूर्तींनी दिलेली शिक्षा अमान्य करत अचानक अश्रफ याने न्यायमूर्तींवर चप्पल फेकून मारली. सुदैवाने ती चप्पल न्यायमूर्तींना लागली नाही. तर न्यायालयाचा अपमान आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.