Principal Secretary Anup Kumar (PC - Twitter)

कोरोना विषाणूपेक्षा (Coronavirus) भयंकर असा 'ॲपोकॅलिप्टीक' व्हायरस (Apocalyptic Virus) येण्याची शक्यता असून त्यामुळे मानव समूहामध्ये कोरोनापेक्षा जास्त मृत्यू होण्याची शक्यता अमेरिकेतील आहारतज्ज्ञ डॉ. मायकल ग्रेगर यांनी सांगितले होते. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीद्वारे बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु, ॲपोकॅलिप्टीक असा कोणताही व्हायरस अस्तित्वात नसल्याचे पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

अनुप कुमार यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, ॲपोकॅलिप्टीक व्हायरस असे शास्त्रीय नाव असणारा कोणताही व्हायरस अस्तित्वात नाही. 'ॲपोकॅलिप्टीक' या शब्दाचा अर्थ जगाचा विनाश करणारा असा आहे. त्यामुळे डॉ. मायकल यांनी तो त्या अर्थाने वापरला असावा. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, ॲपोकॅलिप्टीक व्हायरस नावाचा विषाणूंचा कोबड्यांना बाधित करणाऱ्या विषाणूंच्या यादीमध्ये समावेश नाही, असंही अनुप कुमार यांनी सांगितलं आहे. (वाचा - Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात आज सर्वाधिक 139 जणांचा कोरोनामुळे बळी; दिवसभरात 2436 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

दरम्यान, डॉ. मायकल ग्रेगर हे आहारतज्ज्ञ आहेत. ते मानवी स्वास्थ तज्ज्ञ नसल्याचे व सदरील बातमी शास्त्रीयदृष्ट्या शहानिशा न करता प्रसिध्द करण्यात आली असल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे. त्यामुळे ॲपोकॅलिप्टीक व्हायरस आजमितीस अस्तित्वात नसल्याचे आणि भविष्यात असा एखादा व्हायरस येऊ शकतो, अशी कल्पना फक्त डॉ. मायकल यांनी मांडली आहे, असंही अनुप कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.