पुणे: डिसेंबर महिन्यात दुसर्‍या कोरोना लाटेची शक्यता पण पालिका सज्ज; महापौर मुरलीधर मोहोळ
Murlidhar Mohol (Photo Credits-ANI)

मुंबई पाठोपाठ पुणे शहरामध्ये आता कोरोना वायरसचा (Coronavirus)  फैलाव मंदावला आहे. नवे रूग्ण वाढण्याचा दर कमी झाला असून रूग्ण सुधारण्याचा दर देखील आता वाढत आहे. पण यामुळे हुरळून जाऊ नका. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनी दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये पुन्हा कोरोनाची लाट येऊ शकते. या दृष्टीने पालिकेने तयारी केली आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असल्याचं सांगितलं आहे.

पुणे शहरातच महाराष्ट्रातील पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर बघता बघता संपूर्ण शहर कोविड 19 चा सावटाखाली आलं. सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या असलेले पुणे शहर हळूहळू सावरलं आहे. सध्या पुण्याचा कोरोनामुक्त होण्याचा दर देशात सर्वाधिक पुणे शहरामध्ये आहे. पण लस नाही तोपर्यंत ढिलाई नाही असा मंत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना दिला असल्याने आगामी काळातही काळजी घेणं आवशयक आहे. मुंबई: MSRTC सांगली विभागातील 105 कर्मचारी BEST Buses ला सेवा देऊन गावी परतल्यानंतर आढळले कोरोना पॉझिटिव्ह.

पुण्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 3,21,398 पर्यंत पोहचला आहे. यामध्ये 7798 लोकांचा बळी गेला आहे. मागील काही महिन्यात अपुरे बेड, वेळेत अ‍ॅम्ब्युलंस न मिळाल्याने काही रूग्ण दगावल्याचं समोर आल्यानंतर प्रशासनावर चौफेर टीका करण्यात आली होती. मात्र आता परिस्थिती सुधारल्याचं महापौरांचं मत आहे. सध्या महाराष्ट्राचा एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 16,60,766 पर्यंत पोहचला आहे.

मुंबई, पुण्यात आता लॉकडाऊन मधून शिथिलता आल्याने वर्दळ पुन्हा सुरू झाली आहे. पण हीच काळजी घेण्याची वेळ आहे. आगामी सणासुदीचा काळ, ऋतूचक्रात बदल होऊन पडणारी थंडी यामुळे कोरोना पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सध्या युरोपातही मंदावलेला कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. युके, आयर्लंड, जर्मनी मध्ये लॉकडाऊन पुन्हा कडक करण्यात आला आहे.