Thackeray group activists protest on Marine Drive (PC - Twitter)

Jalna Violence: राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे सलग तिसऱ्या दिवशीही तणाव वाढल्याने जालन्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या घटनेचे पडसाद आता मुंबईपर्यंत उमटले असून, ठाकरे गटाने रविवारी सकाळी मरीन ड्राइव्हवर आंदोलन सुरू केले.

आज जालन्यातील मराठा समाजावरील लाठीचार्ज विरोधात आपला विरोध व्यक्त करण्यासाठी ठाकरे गटातील तरुण आणि कार्यकर्ते लक्षणीय संख्येने मरीन ड्राइव्हवर जमले आहेत. पहाटेपासून सुरू झालेल्या आंदोलनामुळे परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन आझाद मैदानात हलवण्याचे पोलिसांचे आदेश असूनही, कार्यकर्ते मरीन ड्राइव्हवर निदर्शने करण्याच्या त्यांच्या निर्धारावर ठाम आहेत. (हेही वाचा - Maratha Reservation: जालन्यात मराठा आरक्षणावरून हिंसाचार केल्याप्रकरणी 360 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल)

जालना घटनेच्या विरोधातील पडसाद कमी होण्याचं नाव घेत नाहीत. लातूर शहरासह जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मात्र, रात्र पडताच लातूर बार्शी महामार्गावरील साखरपाटी येथे तरुणांच्या टोळक्याने महामार्गावर टायर पेटवून वाहतूक ठप्प केली. त्यानंतर मोठा अडथळा निर्माण झाला. अखेर पोलिसांनी परिस्थिती निवळली.

दरम्यान, जालन्यात परिस्थिती तणावपूर्ण आहे. गेल्या दोन दिवसांत 750 जणांवर जाळपोळ आणि दगडफेकीशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. या घटनांप्रकरणी आतापर्यंत एकूण 15 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. तथापी, सध्या सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 8 तारखेला होणारा शासनाचा शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलला आहे.