Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट, 'मला जेलमध्ये टाकण्यासाठी तत्कालीन सीपी संजय पांडे यांना महाविकासआघाडी सरकारचे टार्गेट'
Devendra Fadnavis | (Photo Credit - ANI)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तत्कालीन महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारवर जोरदार टीका करतानाच गौप्यस्फोट केला आहे. महाविकासआघाडी सरकारच्या काळात तत्कालीन सीपी संजय पांडे यांना आपणास अटक करण्याचे टार्गेट देण्यात आले होते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. पण, तो आगामी आर्थसंकल्पापूर्वी केला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या वेळी बोलताना ते म्हणाले, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी या आधीही अनेक वेळा खासगीत बोलताना मला पदमुक्त करण्यात यावे अशी भूमिका व्यक्त केली होती. अनेकदा ते माझ्याशी पदमुक्त करण्याबाबत खासगीत बोलत असत. त्यामुळे आता त्यांनी ते जाहीरपणे म्हटले इतकेच. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे आहेत. ते तुमची एकट्याची मालकी नाही. या विधानातून फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. (हेही वाचा, Uddhav Thackeray Alliance With VBA: महाविकासआघाडीला चौथा मित्र, वंचित बहुजन आघाडीसोबत युतीची उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून घोषणा)

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी बोलताना राज्याचा विकास, आर्थिक प्रगती, राजकारण, शिवसेना भाजप युती अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. काही मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाष्य केले तर काही मुद्द्यांवर थेट न बोलता अप्रत्यक्षपणे भाष्य केले. आगामी काळात भाजप आणि विरोधक यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यताच फडणवीस यांनी बोलताना अप्रत्यक्षरित्या व्यक्त केली.