Uddhav Thackeray, Prakash Ambedkar | (Photo Credit - Twitter)

राज्याच्या राजकारणात नव्या युतीची घोषणा झाली आहे. ही युती शिवसेना-भाजप, काँग्रेस- राष्ट्रवादी, महाविकासआघाडी, अथवा इतर कोणत्याही आघाडीपेक्षा वेगळी आहे. ज्याची राज्याच्या राजकारणात कित्येक वर्षांपासून चर्चा होती आणि राज्यातील महाविकासाघाडी सरकार कोसळल्यानंतर याची चर्चा काहीशी अधिकच होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे (Uddhav Thackeray Alliance With VBA) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी या युतीची घोषणा आज संयुक्तरित्या केली. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्या या नव्या युतीमुळे एकनाथ शिंदे गटासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

महाविकासआघाडीला चौथा भिडू

वंचित बहुजन आघाडीच्या रुपात महाविकास आघाडीला नवा भिडू मिळाला आहे. या आघाडीची चर्चा पाठिमागील अनेक दिवसांपासून सुरु होती.सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध होता. मात्र, आता त्यांचा विरोध मावळला आहे. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिदे यांच्या विरोधात महाविकासआघाडी नव्या व्युव्हरचनेसह मैदानात उतरणार आहे. शिवाय, वंचित बहुजन आघाडी शिवसेनेसोबत आल्याने राज्याच्या राजकारणालाही नवे वेळण मिळणार आहे. (हेही वाचा, Balasaheb Thackeray Birth Anniversary 2023: उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर बीएमसी निवडणुकीसाठी आज करणार युतीची घोषणा)

आजोबा समकालीन

उद्धव ठाकरे यांनी या वेळी बोलताना सांगितले की, आंबेडकर नावाला देशात इतिहास आहे. आमच्या दोघाचे आजोबा ( ठाकरे आणि आंबेडकर) समकालिन होते. समाजातील वाईट प्रथांवर प्रहार हा दोघांच्याकी कार्यातील महत्त्वाचा दुवा होता. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत, असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी या वेळी काढले.

ट्विट

आंबेडकरांचा प्रस्ताव

प्रकाश आंबेडक यांनी युतीसाठी शिवसेनेकडे इच्छा व्यक्त केली होती. याबाबत एक प्रस्तावही उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान, या प्रस्तावावर सखोल चर्चा झाली. त्यानंतर किमान समान कार्यक्रमावर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा झाली. दरम्यन, प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध होता. मात्र, आता तो विरोध मावळ्याचेही स्पष्ट झाले.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच 'बाळा साहेबांची शिवसेना' या पक्षाची 'द पीपल्स' रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्याशी युती करण्याची घोषणा केली. कवाडे हे महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील एक उल्लेखनीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.