दिलासादायक! राज्यात मुंबई, ठाणेसह 15 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना विषाणू रुग्णसंख्येत घट- आरोग्यमंत्री राजेश टोपे
Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने चांगलेच थैमान घातले होते. राज्यातील कोरोना रुग्ण संख्या दिवसाला 60 हजाराच्या वर गेली होती. मात्र पुन्हा एकदा शासनाच्या प्रयत्नामुळे या संसर्गावर काही प्रमाणात मात्र करण्यात यश मिळाले आहे. राज्यातील सुमारे 15 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून, अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून आज राज्यात कोविशिल्डचे 9 लाख डोस प्राप्त झाले आहेत.

याद्वारे 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे 18 लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 1 मेपासून 18 ते 44  वयोगटाच्या लसीकरणास सुरूवात झाली. आतापर्यंत या वयोगटातील सुमारे 1 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यांच्या लसीकरणाला गती येण्यासाठी कोविशिल्ड लसीचे 13 लाख 58 हजार तर कोवॅक्सिन लसीच्या 4 लाख 89 हजार अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

स्पुटनिक लस भारतात आली असून तिच्या दराबाबत चर्चा सुरू असून ते निश्चित झाल्यानंतर त्याचे डोस राज्यात मागविले जातील, असेही टोपे यांनी सांगितले. सध्या केंद्र शासनाकडून राज्याला दररोज 40 हजाराच्या आसपास रेमडेसिविर मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे ते कमी पडत आहेत. पुरवठा झालेले रेमडेसिविर जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांना वाटप केले जात आहेत. यासह राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत 150 ऑक्सिजन प्लांट (हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे) खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.

अशाप्रकारे राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.