Nana Patole On Modi Government: मोदी सरकार गेल्या 7 वर्षांपासून फक्त एन्जॉयच करत आहे- नाना पटोले
Nana Patole, Narendra Modi (Photo Credit: ANI, PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यासहीत राज्यातील एकूण चार खासदारांना मंत्रीपद मिळाले आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडाळाच्या विस्तारावरून विरोधकांकडून परखड शब्दांमध्ये टीका केली जात आहे. यातच महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मोदी सरकारने गेल्या 7 वर्षात केवळ एन्जॉयच केले आहे आणि सत्तेचा आनंद उपभोगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात उद्या (8 जुलै) काँग्रेस पक्ष राज्यभर सायकल रॅलीमार्फत आंदोलन करणार आहे. मोदी सरकारची धोरणे आणि देशात वाढणाऱ्या महागाईचा निषेध करण्यासाठी राज्यातल्या तालुक्याच्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर सायकल मोर्चा नेण्यात येणार आहे. या रॅलीत स्व:ता नाना पटोले सहभागी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच मोदी सरकारने गेल्या 7 वर्षात फक्त एन्जॉय केला आहे आणि जनतेचे नुकसान केले आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार केल्याने किंवा नाही केल्याने काहीच फरक पडत नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते Eknath Khadse यांना ED ने बजावले समन्स; उद्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार नेत्यांना संधी मिळाली आहे. यात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, भागवत कराड यांचा समावेश आहे. दरम्यान, एनडीएमधून शिवसेना आणि अकाली दलाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या पक्षांना देण्यात आलेले मंत्रिपद हे रिक्त होते. यासोबतच केंद्रीय मंत्र्यांच्या निधनानंतरही मंत्रिपद हे रिक्तच होते. त्या सर्व जागांवर आता नवीन चेहरे देण्याचा निर्णय नरेंद्र मोदींनी घेतला आहे.