राज्यातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी शासनाकडून 10 हजार एसटी बसेसमार्फत मोफत सेवा पुरवण्यात येणार - विजय वडेट्टीवार
Vijay Namdevrao Wadettiwar | (Photo credit : facebook)

लॉकडाऊनमुळे (Lockdown) राज्यातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी शासनाकडून 10 हजार एसटी बसेसमार्फत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी माहिती दिली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या लोकांना पुढील 4 दिवसांत त्यांच्या गावी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून 10 हजार एसटी बसेसमार्फत मोफत सेवा पुरवण्यात येणार आहे. यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून एसटी महामंडळाला आवश्यक निधी देण्यात येणार असल्याचही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - दारूच्या दुकानांसमोर रांगा लावणाऱ्या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा; खासदार इम्तियाज जलील यांची राज्य सरकारकडे मागणी)

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आतापर्यंत 3 वेळा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये विविध राज्यात तसेच जिल्ह्यात मजूर, विद्यार्थी अडकून पडले आहेत. या सर्वांना आप-आपल्या घरी पोहोचण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 15 हजार पेक्षा जास्त झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.