कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृहं मार्च महिन्यापासून बंद होती. त्यामुळे नाटकप्रेमींची निराशा तर नाट्य व्यावसायिकांना काही अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र मिशन बिगेन अनेग (Mission Begin Again) च्या अंतर्गत नोव्हेंबर महिन्यात राज्यातील नाट्यगृहं खुली करण्यास परवानगी देण्यात आली आणि उद्या अखेर पहिला नाट्यप्रयोग पार पडणार आहे. रविवार, दिनांक 20 डिसेंबररोजी इशारो इशारो में या नाटकाचा पहिला प्रयोग दुपारी साडेचार वाजता बोरिवली (Borivali) येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात (Prabodhankar Thackeray Natya Mandir) रंगणार आहे. यासाठी नाट्य संकुलाचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
कोविड-19 चे संकट अद्याप संपलेले नसल्याने विशिष्ट नियमांचे पालन नाट्यगृहात करण्यात येणार आहे. 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा प्रयोग रंगणार असून प्रवेशद्वारावर नाट्यरसिकांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मास्कचा वापर अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यमंदिर संकुलातील मुख्य व लघु नाट्यगृहांची सुविधा देखील अटी, शर्थींच्या आधारे सुरु करण्यात येणार आहे.
ठाणे, नवी मुंबई नंतर आता मुंबईतील नाट्यगृहांना देखील भाडे दरात सवलत देणार असल्याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. या नव्या निर्णयामुळे ट्यगृहांच्या भाडेदरात 75 टक्क्यांची सवलत देण्यात येणार असून 31 मार्च 2021 पर्यंत किंवा 50 टक्के प्रेक्षक उपस्थिती असे पर्यंतच ही सवलत लागू राहणार आहे. मात्र या निर्णयामुळे नाट्य व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर नाटकं पुन्हा सुरु होणार म्हणून रसिकांची कळीही खुलली आहे. (मुंबई मधील नाट्यगृह भाडे दरात 75% सवलत; पालिकेचा नाट्य व्यावसायिकांना दिलासा)
दरम्यान, अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाल्याने ते 7 दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. त्यामुळे 'एका लग्नाची पुढची गोष्ट' नाटकाचे बोरिवली आणि गडकरी रंगायतमधील प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. पुण्यात 12 डिसेंबर रोजी या नाटकाचा रिओपनिंगचा पहिला प्रयोग पार पडला होता.