Rohit Pawar On ED Notice: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची आज पहाटे चार वाजता नवी मुंबईतील एपीएमसीमधील भाजी मार्केटला (APMC Market) भेट दिली. यावेळी रोहित पवार यांनी माथाडी कामगार, व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये येणाऱ्या अडचणी येत्या अधिवेशनात मांडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. याशिवाय केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. मात्र, राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, अशी ग्वाहीदेखील रोहित पवार यांनी यावेळी दिली.
दरम्यान, यावेळी पत्रकारांनी राज्यातील नेत्याच्या ईडी चौकशीसंदर्भात प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले की, आतापर्यंत ईडीच्या नोटीसा भाजपाच्या लोकांना नाही, तर फक्त विरोधकांना आल्या आहेत. यावरून आपण भाजपचा कारभार समजून घेऊ शकतो. उद्या मलादेखील ईडीची नोटीस येऊ शकते, अशी खोचक टीकादेखील रोहित पवार यांनी यावेळी भाजपवर केली. (हेही वाचा - Aurangabad Name Change: औरंगाबाद नव्हेतर पुण्याचे नामकरण संभाजीनगर करावे- प्रकाश आंबेडकर)
भाजपकडून ईडीचा वापर केवळ राजकीय हेतुने केला जात आहे. गेल्या पाच वर्षात याचा अनुभव सर्वांना आला आहे, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले. येत्या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की, भाजपाच्या विचारधारेला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढेल. महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी समीरकरण योग्य पद्धतीने जुळून येऊ शकतं.
यावेळी आमदार देवेंद्र जी भुयार, सभापती अशोक जी डक, तेजस शिंदे, हृषिकेश शिंदे तसंच बाजार समितीचे आणि पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. pic.twitter.com/zDCdn262z9
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 5, 2021
दरम्यान, शेतकऱ्याच्या शेतातील फळं-भाजीपाला ग्राहकापर्यंत येण्याच्या प्रक्रियेत बाजार समिती हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यादृष्टीने नवी मुंबईत वाशी बाजार समितीला पहाटे भेट देऊन शेतकरी, आडते, व्यापारी, माथाडी कामगार, किरकोळ विक्रेते यांच्याशी चर्चा केली आणि तेथील प्रक्रिया समजून घेतल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं.