Departmental Examination Of Police: परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त यांची विभागीय परीक्षा ऑगस्टमध्ये घेण्यात येणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

Departmental Examination Of Police: परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त यांची विभागीय परीक्षा ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे. त्यांना परीक्षेसाठी पुस्तकासह परवानगी असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी दिली आहे. कोरोना संकटामुळे (Coronavirus) राज्यातील पोलीस यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे सदर परीक्षा रद्द करण्याची मागणी राज्यातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आली होती. त्यामुळे यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षासाठीच्या दोन परीक्षांकरिता पुस्तकांसहित परीक्षेची परवानगी देणात येणार असल्याचं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त या पदावर सरळसेवेने नियुक्त झालेल्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी त्यांचा परिविक्षाधीन कालावधी संपल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या विभागीय परीक्षेचे आयोजन करण्यात येत असते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. परंतु, जुलै 2013 नंतर आयोगामार्फत अशी विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील 182 अधिकारी ही परीक्षा देणे बाकी आहेत. (हेही वाचा - Mumbai Rain Updates: मुंबईसह उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नळ बाजार परिसरातील गोल देऊळ येथे साचले पाणी, पहा फोटो)

याशिवाय 22 मे 2020 च्या शासन निर्णयान्वये पोलीस अधिकारी (निवडश्रेणी व उच्च श्रेणी) यांच्या विभागीय परीक्षांचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात आला. त्यामुळे सदर परीक्षा आता अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) आणि महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक यांच्यामार्फत घेण्यात येणार असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.